अकरावीचे वर्ग कसे आणि कधी सुरू होणार? पालकांचा सवाल

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचा तिसरा टप्पा सुरू झाला, तरी अद्याप शासनाकडून अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार?, वर्ग कसे सुरू करायचे? याबाबत कोणतीही सूचना अद्याप कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे अकरावीच्या शैक्षणिक वर्षाबाबत विद्यार्थी-पालक संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
इयत्ता अकरावीचे वर्ष म्हटलं की शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्याचा ‘एंट्री पॉंइट’ आणि करिअरचा ‘टर्निंग पॉंईट’. म्हणूनच विद्यार्थ्यांइतकेच त्यांचे पालकही मुलांच्या अकरावी प्रवेशाबाबत उत्सुक असतात. परंतु यंदा या उत्सुकतेपेक्षा विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश एकदाचा निश्चित व्हावा, अशी शहरी पालकांची भावना असल्याचे दिसून येते.
– उद्योगांसाठी पुण्यालाच पसंती; कमर्शिअल स्पेसकडे वळल्या व्यावसायिकांच्या नजरा!
स्वत: वेलनेस सल्लागार असणाऱ्या सरोज भगत म्हणतात, “कोविड-19मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर निश्चितच परिणाम होत आहे. डिसेंबर महिना सुरू झाला, तरीही अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन का होईना!, परंतु नियमित वर्ग कधी सुरू होणार हा प्रश्न कायम आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. पण, त्याचा म्हणावा तसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. यंदा अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार, याबाबत सरकारने कोणत्याही सूचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ उडत आहे.”
– गिर्यारोहण दिन विशेष : आफ्रिकेच्या किलीमांजारोवर तिरंगा फडकला
खासगी कोचिंग करणारे आणि स्वत: एक अकरावीच्या विद्यार्थिंनीचे पालक असणारे महादेव मेश्राम यांनी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले जाण्याची भिती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “माझी मुलगी वृषाली हिच्या अकरावीच्या प्रवेशाबाबत मी स्वत:च तिच्याइतका उत्सुक होतो. परंतु यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तिचा प्रवेश पहिल्या फेरीत निश्चित झाल्याने निर्धास्त आहे. परंतु अद्यापही प्रवेश फेऱ्या सुरू आहेत. असे असताना अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करायचे, याबाबत राज्य सरकारच्या पातळीवरून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे नेमकं अकरावीच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.”
– रेशन दुकानांमध्ये तांदळाचा तुटवडा, डाळीही गायब
“अकरावीच्या शैक्षणिक वर्ष सुरू कधी सुरू करणार याबाबत राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सुचना अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळे पालक म्हणून आम्ही सध्या संभ्रमात आहोत. डिसेंबरमध्येही अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने याबाबत निर्णय जाहीर करावा.”
– विनोद सोनावणे, पालक (खासगी कंपनीत टेक्निशियन)
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)