अकरावी अॅडमिशन : यंदा कटऑफ वाढणार; आवडत्या कॉलेजसाठी विद्यार्थ्यांमध्ये रंगणार चुरस!

पुणे : इयत्ता १०वीचा निकालाचा आणि गुणांचा टक्का चांगलाच वाढल्याने विद्यार्थांना आता ११वी प्रवेशासाठी आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. निकाल चांगला लागला असल्याने यंदाचा कट ऑफ देखील २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला, तर पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल ९७.९३ टक्के लागला. यामुळे पुणे शहरात प्रवेशासाठी जोरदार स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी पुणे विभागाचा निकाल ८२.४८ टक्के एवढा लागला होता.
– नव्या शिक्षण धोरणाबाबत काय म्हणताहेत शिक्षण तज्ज्ञ? वाचा सविस्तर
यंदा पुणे जिल्ह्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजार ६६८ इतकी आहे. त्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किमान १५ हजार आहे.
गेल्या वर्षी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे सुमारे ५ हजार विद्यार्थी होते. यंदा ही संख्या तिप्पट झाल्याने पुण्यातील नामांकित महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांचा कट ऑफ किमान २ ते ५ टक्के वाढेल अशी शक्यता आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांनीही त्याचा अर्ज भरताना महाविद्यालयाचा पसंती क्रमांक व्यवस्थीत द्यावा लागणार आहे.
– ११वी अॅडमिशनबाबत विद्यार्थी आणि पालकांना दिलासा; फॉर्म भरण्यासाठी लागणार फक्त मार्कशीट!
“राज्यातील टाॅपर विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेतात, पण यंदा कोरोना मुळे कितीजण पुण्यात येतील हे पहावे लागणार आहे. निकाल चांगला लागल्याने कटऑफ वाढेल. ज्या महाविद्यालयात जागा कमी आहेत तेथे कटऑफ जास्त प्रमाणात वाढेल.”
– डाॅ. दिलीप सेठ, प्राचार्य, स. प. महाविद्यालय
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)