अजितदादांची शिस्त म्हणजे शिस्त! स्वत: कार्यक्रमस्थळी केली स्वच्छता, वेळेवर येण्याबाबत म्हणाले…

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. आज अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. इथंही त्यांच्या शिस्तीचा परिचय आला. अजित पवार हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला.यावेळी त्यांनी स्वतः कचरा  उचलत बाजूला केला.

आम्हाला बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरु करायची सवय लागलीय.. पवारसाहेबांमुळे ही सवय लागलीय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कार्यक्रमादरम्यान सांगितलं. आता अनेकजण त्यामुळं थोडं दबकतात की हा बाबा कधी येईल याची शाश्वती नाही, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. याशिवाय ‘मुद्दाम कुणाला तरी त्रास द्यायचा अशी भुमिका नसते.. लवकर काम सुरु केलं की इतर कामांनाही वेळ देता येतो’ असही टोला त्यांनी लगावला आहे. 

बैलगाडा शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका, पण… : अजित पवार

वैद्यकीय व्यवसाय हा पैसा कमवायचा धंदा नाही

अजित पवार बारामतीत म्हणाले की, आता काळ बदललाय.. मात्र आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत.  मात्र हा व्यवसाय करताना आपण आपलं सामाजिक भान ठेवलं पाहिजे वैद्यकीय व्यवसाय हा पैसा कमवायचा धंदा नाही.. तर तो रुग्णसेवेचा, मानवसेवेचा वसा आहे,  असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.  

बैलगाडा शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका 

बैलगाडा शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत बोलत होते. ते म्हणाले की, संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे.  आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published.