अण्णांच्या मनधरणीसाठी आता देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत

राळेगण सिद्धी : नवी दिल्लीच्या हद्दीवर दीड महिन्यांपासून उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयात जाऊनही मोदी सरकारची अडचण कमी झालेली नाही. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाचा करण्याचा इशारा दिला आहे.

अण्णांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी भाजपने विविध माजी मंत्री, पक्षातील नेत्यांना पाठवले होते. परंतु अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे स्वतः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजारे यांच्या भेटीसाठी राळेगण सिद्धीत आज (ता. २२ ) दुपारी येत आहेत.

स्वामीनाथन आयोगानुसार शेती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी यासाठी हजारे उपोषण आंदोलन करणार आहेत. हजारे यांनी सन २०१८ व २०१९ या  दोनही वर्षी आंदोलन केले होते.

हेही वाचा – अण्णांच्या ड्रायव्हरची शेती बघून व्हाल अवाक

या वेळी पंतप्रधान कार्यालय,  तत्कालिन कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत तसेच कृषीमंत्री राधामोहन सिंह, फडणवीस यांनी हजारे यांना लेखी आश्वासन दिले होते. त्यात केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते.

केंद्रीय कृषिमूल्य आयोग आला स्वायत्तता देण्यासाठी अधिकार समिती आपण तातडीने स्थापन करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही. हजारे यांनी अनेकदा पत्र पत्रव्यवहार केला. परंतु त्याचे काही उत्तर आले नाही.

काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते संसदेमध्ये त्यांचे गुणगान गात होते आणि आता पत्राचे साधे उत्तरही दिले जात नसल्याने सरकार सूडबुद्धीने वागत असल्याची भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. हे सरकार खोटी आश्वासने देते, हे असा आरोप करीत हजारे यांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे.

संपादन – अशोक निंबाळकर
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *