अबब..! मृत्यूदरात सोलापूर राज्यात चौथे; मंगळवारी कोरोनाबाधित पाचजण दगावले

सोलापूर : सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे वाढता मृत्यूदर चिंताजनक आहे. मंगळवारी (ता. 23) नव्याने सापडलेल्या 15 रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मलिा हॉस्पिटल, जोडभावी पेठ, उमा नगरी, स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, देशमुख-पाटील वस्ती, गांधी नगर, अक्कलकोट रोड या परिसरात प्रत्येकी एक तर आशा नगर, एमआयडीसी परिसरात तीन आणि राजीव नगर, अक्कलकोट रोड येथे पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आतापर्यंत एक हजार 59 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकूण रुग्ण संख्येत मात्र घोळ कायम
सोलापूर शहरात आतापर्यंत एक हजार 972 रुग्ण सापडले असून त्यापैकी एक हजार 59 रुग्ण बरे झाल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सोमवारी (ता. 22) रुग्णसंख्येत 40 लोकांची भर पडली असून ते मृत रुग्ण मागील दोन महिन्यातील असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. दुसरीकडे सोमवारी एकूण रुग्ण संख्या एक हजार 957 होती आणि मंगळवारी त्यात 15 रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या एक हजार 972 झाली. मात्र, महापालिकेने अद्याप एकूण रुग्णसंख्येत मृत 40 व्यक्तींचा समावेश केलेला नसल्याने रुग्णसंख्येचे गौडबंगाल कायम आहे.
सोलापुरातील मृत्यूची संख्या 218 वर
सोलापुरातील कोरोना या विषाणूची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न करुनही अद्यापही ती तुटलेली नाही. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस भर पडत असतानाच मृत्यूदरही वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. 23) सोलापुरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून 15 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. बेगमपेठेतील 70 वर्षीय, जोडभावी पेठेतील 60 वर्षीय, हनुमान नगरातील 66 वर्षीय, चंडक बाग, बुधवार पेठेतील 67 वर्षीय आणि पाचकंदिलजवळील मोदी परिसरातील 85 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.