आता जयंतरावांची वेळ आणि खेळ…

अडीच वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाजपने काठावरचे बहुमत घेत घेतलेली सांगली महापालिकेची सत्ता आज अधिकृतपणे गेली. अधिकृतपणे म्हणण्याचे कारण असे की राज्यात सत्तांतर झाले तेव्हाच ती अनधिकृतपणे गेली होती. कारण महापालिकेच्या सत्ताकारणासाठी आवश्‍यक असे कसबच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडे नव्हते. पालकमंत्री झाले तरी महापालिकेत पाऊल न टाकलेल्या जयंत पाटील यांनी आता महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली आहे. आता त्यांची वेळ सुरू झाली आहे… 

गेले वर्षभर महापालिकेत आयुक्‍तांकडूनच सत्ताधाऱ्यांना डावलून निर्णय घेतले जात होते. महापौरांसह सर्व पदाधिकारी नामधारी झाले होते. भाजपची सत्तेवरची कमांडच संपली होती. भाजपचे नगरसेवक आपल्या कब्जात घेण्याची खेळी राष्ट्रवादीचीच, पण त्यास कॉंग्रेसची नेमकी साथ मिळाल्याने भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम झाला. या निवडणुकीची धुरा महापालिकेत छोटा भाऊ असलेल्या राष्ट्रवादीने हाती घेतली होती. त्याला जयश्री पाटील, विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील या कॉंग्रेस नेत्यांनी फक्त “मम’ म्हटले. 36 सदस्य टिकवतानाही भाजपला दाम आणि धाक दाखवावा लागला. 

महापालिकेतील कारभारी स्वार्थासाठी कोणत्या टोकाला जातात याचा इतिहास संभाजी पवार, मदन पाटील आणि जयंत पाटील या तिघांनीही अनुभवला आहे. वरकरणी हा सत्ताबदल वाटत असला तरी महापालिकेतील सोनेरी टोळीच कमी अधिक समीकरणे मांडून सत्तेत असते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. यावेळी पालिका राजकारणात नवखे असलेल्या सुधीर गाडगीळ, चंद्रकांत पाटील यांना आला इतकेच. 

भाजपने गेल्या पाच वर्षांत मोठ्याप्रमाणात आयात माल घेतला होता. आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. स्थायी समितीचा सभापती निवड होतानाच भाजपला आपल्या जहाजाला भोके पडू लागल्याची कल्पना आली होती. भाजपचे दोन्ही आमदार, खासदार यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. यापुढे तो अधिक ठळक होईल. खासदार संजयकाका पाटील यांचा जयंतरावांसोबतचा जुना याराणाही आता अधिक उघड होत आहे. 

भाजपची सत्ता असताना तत्कालीन फडणवीस सरकारने 100 कोटींचा निधी विकासाठी दिला होता, पण सत्ता गेल्यानंतर निधीच्या दुष्काळाबरोबरच भाजप नेत्यांचा पालिका सत्तेतील रसही संपत चालला होता. ज्यांच्याकडे पालिकेची धुरा होती, त्या शेखर इनामदार यांच्याबाबत नगरसेवक उघड नाराजी बोलून दाखवत होते. हा सारी मोट बांधू शकेल असे नेतृत्व भाजपकडे नव्हते. आयुक्त मिरजेतील एका गटाचे झाले होते. राज्यातील सत्ताबदलानंतर आयुक्तांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता नियंत्रित केली होती. अर्थात त्याचे पडद्याआडचे सूत्रधार जयंत पाटील जसे आहेत, तसेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाजही आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवेळी हा सारे स्पष्ट झाले होते. हा ठराव रद्द करताना बहुमत असूनही स्थायी समितीत हा ठराव रद्द करण्यासाठी भाजपला दिव्य करावे लागले होते. 

इथे भाजप वाढला तो जयंत पाटील यांच्या सहकार्यानेच, पण तो एवढा वरचढ होईल आणि इस्लामपुरातही आपल्याला धक्‍का देईल असे त्यांना वाटले नव्हते. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने जयंत पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. जिल्हा परिषदही ताब्यात घेतली, महापालिकेवरही कब्जा मिळवला. राष्ट्रवादीचे अनेक मोहरे त्यांनी फोडले. त्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ होते. राज्यातील सत्ताबदलानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील पूर्वीच्या फॉर्ममध्ये आले आहेत. आता पुढची अडीच वर्षे जयंतरावांची आहेत. आघाडीच्या शेवटच्या पर्वाचा त्यांना अनुभव आहेच. आत्ताही त्यांच्याकडे शेवटची अडीच वर्षे आहेत. तेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्याच्या सत्तेतील प्रमुख वाटा असलेल्या राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आणि टॉपचे मंत्री आहेत. आता महापालिकेच्या विकासाची ते जबाबदारी घेतात की पुन्हा मागील पानावरून पुढे खेळ करतात; की त्यांचा खेळ होतो हे लवकरच स्पष्ट होईल. 

संपादन : युवराज यादव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *