आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड; सहा दिवसांत ९६ हजार ६२९ जागांसाठी ८५ हजार ५८५ अर्ज

वर्धा : आरटीई प्रवेशासाठी राज्यात पुणे आणि नागपूर जिल्ह्यांत उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा जवळपास दुपटीने अर्ज अवघ्या सहा दिवसांत आले आहेत. त्यामुळे यंदा आरटीईच्या प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात तीन मार्चपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ मार्च आहे. शिक्षण विभागाकडे ५ ते ६ दिवसांतच प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत.
पुण्यात १४ हजार ७७३ जागांसाठी २४ हजार ४९९ तर नागपूर जिल्ह्यात ५ हजार ७२९ जागांसाठी ९ हजार ९२५ अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम तारखेपर्यंत अर्जात तिप्पट-चौपट वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशांतर्गत पाल्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा पर्याय पालकांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घसरणीवर आली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. राज्यातील आरटीईच्या जागाही कमी झालेल्या आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या ९६ हजार ९२९ तर नागपूर विभागात १० हजार ७२० जागा आहे. वर्ध्यात गत तीन वर्षांपासून अनेक संस्थाचालकांना परतावा मिळाला नसल्याने त्यांच्याकडून या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याची तयारी सुरू आहे.
अधिक वाचा – महिलादिनीच संतापजनक प्रकार! नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं केला नर्सवर बलात्कार
नागपूर विभाग
जिल्हा | आरटीई शाळा | रिक्त जागा | प्राप्त प्रवेश अर्ज |
भंडारा | ९४ | ७९१ | ७३४ |
चंद्रपूर | १९६ | १५७१ | ११९४ |
गडचिरोली | ७६ | ६२४ | २१४ |
गोंदिया | १४६ | ८७६ | ७७४ |
नागपूर | ६८० | ५७२९ | ९९२५ |
वर्धा | ११६ | ११२९ | १३०० |
एकूण जागा | १० हजार ७२० | प्राप्त अर्ज १४ हजार १४१ |
राज्यात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज दाखल जिल्हे
जिल्हा | जागा | अर्ज |
औरंगाबाद | ३६२५ | ४६४९ |
पुणे | १४७७३ | २४४९९ |
नाशिक | ४५४४ | ५२३५ |
नागपूर | ५७२९ | ९९२५ |