ऊसतोड कामगारांचा संप! हार्वेस्टरप्रमाणेच टनाला 400 रुपये द्या; भाजप आमदाराचा पाठिंबा

Sugarcane workers : यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम जवळ आला आहे. या महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील ऊसाच्या गळीत हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच विविध मागण्यांच्या मुद्यावरुन ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, या ऊसतोड कामगारांच्या संपाला शेगाव-पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी संघटनेने संप पुकारला आहे. या संदर्भात भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात  झालेल्या बैठकीत राजळे यांनी देखील या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला आहे. दरवाढीच्या मागण्याविषयी 30 सप्टेंबरला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनांनी संप पुकारला आहे. 

ऊसतोड मजुरांना हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रति टन दर मिळावा

सध्या ऊसतोडणी मजुरांना 273 रुपये प्रति टन दर मिळत आहे. तर हार्वेस्टरला 400 प्रति टन दर मिळत आहे. मात्र, ऊसतोडणी मजूरांना हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रति टन दर मिळावा अशी मागणी मजुरांची आहे. पाथर्डी तालुक्यात जवळपास पन्नास हजार ऊसतोड मजूर असून त्यांचाही या संपाला पाठिंबा मिळावा म्हणून राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून येत्या काळात साखर संघ आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष होणार असल्याचे मानले जात आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ आणि ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचं निर्णय घेण्यात आला.

 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्याची शक्यता

यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु होणार याची चर्चा सुरु आहे. यावर्षी अपेक्षीत पाऊस न झाल्यानं चालू ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं 1 नोव्हेंबर 2023 पासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु होणार याबाबतचा निर्णय होणार आहे. मंत्री समितीच्या बैठकीत ऊसाची थकीत बिले, राज्यातील ऊसाची एकूण उपलब्धता याचा आढावा घेण्यात येईल. याच बैठकीत गाळप हंगामाची तारीख निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकार 1 नोव्हेंबर 2023 पासून गाळप हंगाम सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : साखर कारखान्याचं धुराडं 1 नोव्हेंबरला पेटणार? मंत्री समितीच्य बैठकीत होणार निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *