एनसीआरबी -2019 आकडेवारी : भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर

मुंबई, ता 03 : देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. गंभीर बाब म्हणजे देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे गुन्हे दुप्पट आहेत. पण त्याच्या तुलनेत गुन्ह्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण 15 टक्क्यांवर आहे.
राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2019 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र 891 भ्रष्टाचारासह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दुस-या क्रमांकवर असलेल्या राजस्थानात 424 भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांची संख्या दुपटीहून अधिक आहे. सुदैवाची बाब म्हणजे 2018 च्या तुलनेत त्यात कमतरता आली आहे. 2018 मध्ये राज्यात 936 भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले होते. अधिक नागरीक भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यात पुढे येत असल्यामुळेही राज्यातील भ्रष्टाचाराचे गुन्हे अधिक असण्यास कारणीभूत असल्याचे आका अधिका-याने सांगितले.
महत्त्वाची बातमी : ‘एम्स’च्या अहवालावर रियाच्या वकिलांची मोठी प्रतिक्रिया; सत्य उघड होईलच
राज्यात 866 प्रकरणात आरोपींविरोधात सापळे रचून कारवाई करण्यात आली, तर 21 गुन्ह्यांमध्ये आरोपींनी ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केली होती, तर चार गुन्ह्यांध्ये गुन्हेगारीप्रकारचे गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे देशात 370 गुन्ह्यांमध्येच खटला पूर्ण झाला असून त्यातील 55 गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा झाली आहे, उर्वरीत 294 गुन्ह्यांमध्ये आरोपीची निर्दोष सुटका झाली आहे. 21 गुन्ह्यांध्ये पुराव्या अभावी गुन्हा मागे घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणाबाबत शेवटून दुस-या स्थानावर आहे. महाराष्ट्रात 14.9 टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. देशात हिमाचल प्रदेशात याबाबत सर्वात वाईट स्थिती आहे हिमाचल प्रदेशात गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ 14.7 टक्के आहे.
NCRB 2019 report maharashtra on top in terms of cases of corruption