कसे होणार अधिवेशन? आठ मंत्री, २९ आमदार अन् विधानसभा अध्यक्षांना कोरोना, वाचा

नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस हे अधिवेशन चालेल. मात्र, राज्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. बाधित आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकंदरीत स्थिती पाहता नागरिक कोरोनासोबत जीवन जगत असल्याचे दिसत आहे. यामुळेच कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार आहे. मात्र, सरकारमधील आठ मंत्री, विधानसभेचे २५ आमदार, विधानपरिषदेचे चार आमदार आणि विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने हे अधिवेशन कसे राहील, याची चर्चा आता होत आहे.
राज्य सरकारमधील ३८ लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाली आहे. यांपैकी काही जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. पण तरीही सर्व लोकप्रतिनिधींना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे.
त्यासाठी राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील प्रयोगशाळा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जिल्ह्यात ही चाचणी करून घ्यायची आहे. ५५ पेक्षा अधिक वय असलेले आमदार हे हाय रिस्क झोनमध्ये येतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असल्याने सोलापूर जिल्ह्यातील आरटी-पीसीआर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट त्यांना त्वरित उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या जवळच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
परवाना रद्दचाही आदेश
आमदारांची चाचणी केल्यानंतर ज्या प्रयोगशाळा त्यांचा रिपोर्ट देऊ शकत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आमदारांच्या चाचणीचा रिपोर्ट विधानमंडळ सचिवालयाला सादर केला जाणार आहे.
यांना झाली कोरोनाचा लागण
राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, शिवसेनेचे, अब्दुल सत्तार, काँग्रेसचे असलम शेख, अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधानसभेचे मकरंद पाटील राष्ट्रवादी, किशोर जोरगेवार अपक्ष, ऋतुराज पाटील काँग्रेस, प्रकाश सुर्वे शिवसेना, पंकज भोयर भाजप, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी, मुक्ता टिळक भाजप, वैभव नाईक शिवसेना, सुनील टिंगरे राष्ट्रवादी, किशोर पाटील शिवसेना, यशवंत माने राष्ट्रवादी, मेघना बोर्डीकर भाजप, सुरेश खाडे भाजप, सुधीर गाडगीळ भाजप,, चंद्रकांत जाधव काँग्रेस, रवी राणा अपक्ष, अतुल बेनके राष्ट्रवादी, प्रकाश आवाडे अपक्ष, अभिकामन्यू पवार भाजप, माधव जळगावकर काँग्रेस, कालिदास कोलंबकर भाजप, महेश लांडगे भाजप, मोहन हंबरडे काँग्रेस, अमरनाथ राजूरकर काँग्रेस, मंगेश चव्हाण भाजप, विक्रांत सावंत जत कॉंग्रेस या आमदारांना कोरोनाची बाधा आहे. विधानपरिषदेचे सदाभाऊ खोत भाजप, सुजित सिंग ठाकूर भाजप, गिरीश व्यास भाजप आणि नरेंद्र दराडे भाजप हे आमदार कोरोनाबाधित आहेत. यापैकी काही लोकप्रतिनिधींनी कोरोनावर मात केली असली तरी त्यांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी चाचणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात येते.
संपादन – नीलेश डाखोरे