कृष्णा, वारणा नदीकाठाला यंदाही पुराचा धोका!

सांगली : मागील दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदी काठच्या भागाची चिंता पुन्हा वाढवली असून मागील वर्षीप्रमाने यावर्षी देखील पुराची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. चांदोली धरणातील विसर्ग वाढवून 12 हजार 984 क्युसेक करण्यात आलाय तर दुसरीकडे कोयना धरणातून एकूण 25000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय. तसेच कोयना धरणातुन दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवला जाणार आहे.

कोयना धरणातून 25604 क्युसेक पाण्याच्या विसर्गात वाढ करून आज सकाळी 11 वाजेपासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक करण्यात येईल. चांदोली आणि कोयना धरणातील विसर्गाच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला असून तो दीड लाख करण्यात आला आहे.

उद्या पूर पातळी गाठण्याची शक्यता

या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदी सोमवारी सर्वसाधारण पूर पातळी गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून पंचवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने सोमवारी पाणीपातळी 35 फुटांच्या आसपास जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सांगलीत नदी काठच्या भागात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृष्णा नदी काठी असलेल्या श्री क्षेत्र औदुंबर मधील दत्त मंदीरात पाणी शिरले असून जसजशी पाणी पातळी वाढेल तसे मंदीर पाण्याखाली जाण्यास सुरुवात होणार आहे.

 पावसाची संततधार कायम

एकीकडे चांदोली धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठा 31.01 टीएमसी झाला आहे. पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे चांदोली धरणातील विसर्ग आणखी वाढवून तो 12 हजार 984 क्युसेक करण्यात आला आहे.त्यामुळे वारणा नदीकाठची पिके तीन दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत.

नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी

दुसरीकडे कोयना धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण 90 टीएमसी भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या काही तासात वाढले आहे. त्यामुळं आज सकाळी 8.30 वाजेपासून कोयना धरणातून एकूण 25000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आलाय. या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ देखील होऊ शकते, त्यामुळं कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भात व ऊस शेती पाण्याखाली

कोयनेमधील या विसर्गामुळे चांदोली धरण सध्या 90.14 टक्के भरले आहे . धरणाची पाणीपातळी 623.90 मीटर झाली असून पाणीसाठा 31.01 टीएमसी झाला आहे. एकूण पाऊस 1952 मिलीमीटर झाला आहे. सध्या पावसाची संततधार सुरुच आहे. पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी पाऊस कमी असला तरी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणची भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *