कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीची यात्रा रद्द

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी भाविकांना न येण्याचं आवाहन केलं आहे.

यंदा आंगणेवाडीची यात्रा 6 मार्चला निश्चित करण्यात आली आहे. परंतु भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला न येण्याचं आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. यात्रा रद्द झाली असली तरीही धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत ‘माझी जत्रा माझी जबाबदारी’ असं अभियान जत्रेत राबवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नवसाला पावणारी देवी असल्याने सामान्यांबरोबर राजकीय व्यक्तीचीही इथे रेलचेल असते. ही यात्रा दिड दिवसांची असून 9 लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडीला येतात. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी म्हणून भराडीदेवीची ख्याती आहे. या यात्रेचं विशेष म्हणजे भराडीदेवीच्या यात्रेची तारीख कोणत्याही कॅलेंडर किंवा पंचांगात सापडत नाही. देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते.

कोरोना पार्श्वभूमीवर होणारा हा वार्षिकोत्सव यावर्षी मर्यादित स्वरुपात फक्त आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात येईल अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.

भाविकांच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगिरी व्यक्त करत भाविकांना विनंती, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस नमस्कार करावा आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असं आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.