कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज

पुणे – राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर गुजरात या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याशिवाय पंजाब व मेघालय या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यामुळे आज (ता.२) पासून राज्यात पाऊस जोर धरणार असून उद्या (ता.३) कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. उत्तर भारतात मॉन्सनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, पिलानी, बांडा, चुर्क, हजारीबाग, बेहरामपोर ते मिझोराम, मेघालयपर्यंत आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होत आहे. तसेच मराठवाडा ते उत्तर तमिळनाडूच्या दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र आहे.
यामुळे नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत औरंगाबादमधील कन्नड येथे १०२.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नगरमधील राहुरी, नेवासा, अकोले या परिसरात जोरदार पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. अनेक भागात ढगाळ असून काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती होती.
Edited By – Prashant Patil