कोझीकोडीतील ‘योद्धा’ चिपळूणचा, गावाशी नाळ आजही कायम..

रत्नागिरी : केरळच्या कोझीकोड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून आलेल्या एअर इंडीयाच्या विमानाला झालेल्या भीषण दुर्घटनेत पायलट दीपक वसंत साठे याचा मृत्यू झाला. साठे नागपूरला स्थायिक झाले असले तरी चिपळूण तालुक्यातील शिरळ हे त्यांचे मुळ गाव. साठे यांचा गावाशी कायम संर्पक होता. शुक्रवारी त्यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर शिरळ गाव हळहळलाही आणि अखेरच्या क्षणीही सैनिकाप्रमाणे स्वत:ला मृत्यूच्या खाईत लोटत अनेकांना वाचवणारा सुपूत्र आपल्या गावचा असल्याचा अभिमानही जागृत झाला.

दीपक साठे यांचे कुटुंब मुळचे चिपळूण तालुक्यातील शिरळ येथील आहे. त्यांचे आजोबा दामोदर भास्कर साठे कालपरत्वे चारितार्थ व शिक्षणासाठी नागपूरला गेले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच स्वकर्तृत्वावर विविध महत्वाच्या पदापर्यंत पोहोचले. दीपक यांचे शिरळ येथील चुलत चुलत भाऊ व प्रगतशील शेतकरी प्रकाश साठे यांनी त्यांच्या आठवणी जागवताना सांगितले की, त्यांचे आजोबा श्रीपाद, दीपकचे आजोबा दामोदर आणि बाकीचे विष्णू व शांताराम असे हे चार भाऊ. सर्वांचे शिरळ येथे सामाजिक एकत्र कुटुंब आणि एकच घर. मात्र त्यामध्ये दीपकचे आजोबा दामोदर वयाच्या 20 व्या वर्षीच नोकरीनिमित्त नागपूरला गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. नागपुरात स्थायिक असले तरी हे सारे शिरळ – मालघरच्या रामनवमी उत्सवाला आवर्जुन येत असत.

पुढे मुले मोठी झाली, लष्करात दाखल झाली आणि मग गावात येणे-जाणे कमी होत गेले. मात्र सुरूवातीला पत्रव्यवहार, नंतर दूरध्वनी आणि अलिकडे मोबाईलवरही दीपकसह अन्य कुटुंबियांचा नेहमी संपर्क होऊन एकमेकांची विचारपूस होत असे. दीपक साठे यांनी दहा वर्षांपूर्वी शिरळला भेट देऊन गावच्या वास्तव्याचा आनंदही लुटला होता. त्यानंतर त्यांचे येणे झालेले नसले तरी संपर्क मात्र कायम होता. दीपक यांना जमीन घ्यायची होती, त्यासाठी शेतकरी दाखला कसा मिळेल याबाबतच्या माहितीसाठी जेमतेम वर्षभरापूर्वी दीपक यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाल्याचे प्रकाश साठे म्हणाले. शुक्रवारी रात्री विमान अपघाताची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि त्यात पायलट दीपक साठेंचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्काच बसल्याचे साठे यांनी सांगितले.

सारे कुटुंब देशसेवेत

साठे यांच्या अख्ख्या कुटुंबानेच देशसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. दीपक यांचे वडील लष्करात कर्नल होते. तेथे त्यांनी तीस वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांची दोन्ही मुले सैन्यात भरती झाली. दीपक यांचे मोठे भाऊ विवेक हे देखील पायलट होते. फरोजपूर येथे 1981 मध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हवाईदलात आधिकारी राहिलेले दीपक हे कुशल लढाऊ वैमानिक होते. ते 1981 साली हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रूजू झाले होते.

संबंधित बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published.