कोरोनाचा कठीण काळ, साहित्य कला अकादमीचा पुरस्कार विजेत्यावर मोलमजुरी करण्याची वेळ

सांगली : कोरोनामुळे जितके बळी गेले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने बेरोजगारीमुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले. गेल्या सहा महिन्यांच्या काळात झालेल्या लॉक डाऊनमुळे जगण्याचे संदर्भच बदलून गेलेत . हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर लाखोंचे लहान मोठे उद्योग डबघाईला आले आहेत . याच कोरोनामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवलेल्या युवा साहित्यिकावर कुटुंबाला जगवण्यासाठी मोलमजुरीची वेळ आली आहे . सांगली जिल्ह्यातील उमदी तालुक्यातील निगडी बुद्रुक येथील तरुण नवनाथ गोरे यांनी ही करून कहाणी आहे.

घरात अठराविश्व दारिद्र्य , कायम दुष्काळी असणंऱ्या मुठभर जमिनीच्याया तुकड्यावर वृद्ध आई , मोठा अपंग भाऊ व शिक्षण घेणाऱ्या लहान भाऊ यांचे कुटुंब चालवायची जबाबदारी नवनाथवर होती. यातच शिक्षण घेत कला शाखेतील M.A. B.ed केल्यावर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. पण कोणाचाच वशिला नाही ना पाठबळ त्यामुळे नवनाथने आपल्याच आयुष्यातील काट्याने भरलेली वाट कागदावर उतरवली. आयुष्याची झालेली फेसाटी कागदावरून कादंबरी रुपात आली आणि पाहता पाहता सर्वसामान्यांना ती आपली वाटू लागली. फेसाटीमुळे नवनाथ गोरे साहित्यिक म्हणून समाजासमोर आला. फेसाटीला 2018 साली साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला . यानंतर फेसाटीला अनेक पुरस्कार मिळाले पण नवनाथने आयुष्य मात्र बदलले नाही.

छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत घरातील सामानाच्या बोचक्यांपेक्षा पुरस्कारांच्या शिल्डची गर्दी झाली . वर्तमानपत्र आणि मासिकातून फेसटीच्या कौतुकानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एक सिनियर कॉलेजमध्ये तासिका तत्वावर हंगामी नोकरी मिळाली. महिन्याकाठी थोडेफार पैसे मिळू लागले असतानाच कोरोनाचे संकट आले आणि हे कॉलेज बंद झाल्याने पुन्हा डोळ्यासमोर अंधार पसरला. हळूहळू कोरोनाचे संकट आणि लॉक डाऊन वाढू लागल्याने कुटुंबाची होणारी उपासमार नवनाथ सहन करू शकला नाही आणि त्याने पेन सोडून हातात कुदळ फावडे घेतले आणि मोलमजुरी च्या कमला सुरुवात केली.

कोरोनाच्या संकटामुळे कामही मिळणे अवघड झाले. उसनावरीवर खायला धान्य मिळेना यातच दोन दोन दिवस पाण्यावर काढायची वेळ येऊ लागली. पोटाच्या आगीपुढे अंगातील प्रतिभा घामातून वाहून गेली. या सहा महिन्यात आज कुटुंबाला काय खाऊ घालायचे या विवंचनेत असणाऱ्या नवनाथने गेल्या सहा महिन्यात पेन हातात धरून एक ओळ लिहिली नाही किंवा कोणत्या पुस्तकाचे पानही उघडून बघितले नाही. जगण्याच्या विवंचनेत या कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याचे उद्विग्नपणे नवनाथ सांगतो. अंगातील उर्मी, प्रतिभा सर्वच जगण्याच्या प्रश्नामुळे संपून गेल्याने काही लिहिण्याची इच्छा राहिली नसल्याची निराशा त्याच्या शब्द शब्दातून बाहेर पडते. कोरोनामुळे अनेक राजांचे रंक झाले तसे सिद्धहस्त सरस्वती पुत्रांचे मजूर झाले. शासनाने अशा प्रतिभावान कलरत्नांकडे लक्ष न दिल्यास असे अनेक प्रतिभावंत युवा साहित्यिक जगण्याच्या धडपडीत लोप पावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.