कोरोनाच्या युद्धात भारताने या द्रव्याच्या निर्यातीची केली तयारी

नागपूर : कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी उद्योगांनी या भागात जावे. या क्षेत्राच्या विकासास मी अधिक प्राधान्य देतो. कारण आता शहरांमध्ये उद्योगांसाठी जागा उपलब्ध नसून, असंख्य समस्यांचा उद्योगांना सामना करावा लागतो आहे. नवीन उद्योगांनी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राची निवड केली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
“जॉब ग्रोथ ऍण्ड सस्टेनेबिलिटी’ पुस्तक प्रकाशनच्या प्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. अधिक रोजगार कसे निर्माण होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासामुळे आमची अर्थव्यवस्था अधिक सुधारणार आहे. तसेच उद्योगांना लागणारा कच्चा माल ग्रामीण भागात उपलब्ध असल्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल. आता आयात कमी आणि निर्यात अधिक असे सूत्र स्वीकारावे लागेल असे नितीन गडकरी म्हणाले.
वाचा : नागपूरकरांना लॉकडाऊन 5.0 साठी तयार राहा… हे वागणं बरं नव्हं
वर्धा येथे खादी ग्रामोद्योगामार्फत आम्ही 10 लाख महिलांना सोलर चरखा दिला. 1 लाख रुपये कर्ज देऊन हा चरखा आम्ही त्यांना दिल्याने रोजगार निर्माण झाला. त्या चरख्यातून निघणारे सूतही आम्ही घेत आहोत. अशा लहान लहान उद्योगाच्या माध्यमातून उत्पादन वाढून निर्यातयोग्य स्थिती निर्माण होईल व अर्थव्यवस्था मजबूत होईल. पेट्रोल डिझेलऐवजी आता इथेनॉल, बायो सीएनजी याचा वापर वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी आम्ही यात यशस्वीही झालो आहोत. नागपुरात 250 कार आणि 100 बसेस आम्ही बायो सीएनजीवर चालवीत आहोत. 400 बसेस बायो इथेनॉलवर चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ऊर्जानिर्मिती केंद्राला 325 कोटी रुपयांमध्ये सांडपाणी आम्ही विकले आहे. भारतात दिवसाला 15 हजार कीट तयार होत असून, या कीटला आता निर्यातीची परवानगीही मिळाली आहे. आता सॅनिटायझरही तयार करून तेही निर्यात करू शकतो, असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.