कोरोनासह नोकरी, व्यवसायाचाही तणाव; नैराश्‍य,व्यसनाधीनतेमध्ये चिंताजनक वाढ 

मुंबई – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले आहेत. देशभरात गेल्या चार महिन्यांत अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी किंवा थांबवल्यामुळे नोकरकपात केली. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी घरुन काम करीत असले, तरी तेथेही वेतनात कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक, नोकरदार तसेच हातावर पोट असणाऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली असून याचे विपरीत परिणाम होण्याची भीती नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गेल्या दोन महिन्यांत अकारण भीती वाटणे, शांत स्वभावाच्या व्यक्तीत अचानक रागाची भावना निर्माण होणे, नोकरी गेल्यामुळे अथवा धंदा बंद झाल्यामुळे व्यसनाधीन होणे, अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यासोबतच कोरोनाग्रस्त नागरिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहे. त्यासाठी ‘कोरोना आज है, कल नही’ ही संकल्पना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये राबवली जात आहे, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली.

६० टक्के रुग्णांत अस्वस्थता
कोरोनाची लागण झालेल्या ६० टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आजारांची लागण होऊ शकते, असा निष्कर्ष ‘लॅन्सेट’ अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे आता आर्थिक अस्थिरतेचा खूप मोठा धोका भारताला आहे आणि तो दीर्घ काळ टिकणारा आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या चिंतेच्या वातावरणात रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग, लठ्ठपणा तसेच, व्यसनाधीनता यांचेही प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे केले जाते
उपचारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती घालवण्याचे काम 
मनःशांतीसाठी योगाचे ऑनलाइन प्रशिक्षण
कुटुंबातील सुसंवाद कसा वाढवावा,  समस्येतून संधी कशी निर्माण करावी, यावर मार्गदर्शन

तणाव वाटत असेल तर…
मित्र-मैत्रिणी, शेजारी व नातेवाईकांशी बोला. 
घरातील वातावरण आनंदी ठेवा.
समुपदेशकाबरोबर बोलावे किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा 
वाचन, लिखाण, व्यायाम करावा, चित्र काढावे, संगीत ऐकावे, चांगले चित्रपट विशेषत: हास्यपट पाहावेत
कुटुंबातील सदस्यांशी नियमित संवाद ठेवावा. 
मानसिक आजारांवर उपचार करण्यास पुढे यावे
व्यसनापासून लांबच राहा

Leave a Reply

Your email address will not be published.