कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम!

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने सावध भूमिका घेत महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला खरा पण त्यामुळे पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे येथील गर्दीला मात्र ब्रेक लागल्याचे दिसत नाही. नाताळची सुटी आणि त्यालाच जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे लोकांनी मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी धाव घेतली. राज्यातील प्रमुख महामार्ग अक्षरशः जॅम झाले होते.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबईतून गोवा, कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे आज मुंबई-गोवा महामार्गही ठप्प झाला होता. सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांची रीघ पाहायला मिळाली.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. या कोंडीत अनेक पर्यटक तासन्‌तास वाहनांमध्ये अडकून पडले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तोंडाला मास्क यामुळे अनेकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक मुंबईकर आज गावी जाण्यासाठी निघाल्याने पश्‍चिम द्रुतगती मार्ग, मानखुर्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. दहिसर टोल नाक्‍याजवळही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वाहतूक कोंडीचा फटका
मुंबई, पुणे येथील पर्यटकांनी आज रायगड जिल्ह्यात येण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी सकाळपासून महामार्गावरील पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर वाहनांची रांग दिसून आली. फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. आज सकाळी काही पर्यटक त्यांच्या कुटुंबीयांसोबत तर काही त्यांच्या मित्रमंडळींसमवेत अलिबाग, काशीद, श्रीवर्धनकडे निघाले.

पुणे-सोलापूर हाय-वेवर धावत्या ट्रॅव्हल्स घेतला पेट; जिवीतहानी नाही

लोणावळा गजबजले, हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल

लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर बाजारपेठ गजबजल्या असून, हॉटेल व रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल, रिसॉर्टसह बंगले मालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. 

यंत्रणेची तारेवरची कसरत
मुंबई-गोवा महामार्गांवर सकाळी दहा वाजल्यापासून वाहनांची गर्दी होती. सकाळपासून वाहनाची रांग सुरू राहिल्याने ही वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा मोठा फटका स्थानिकांसह पर्यटकांना बसला. यामुळे वाहनांचा वेग मंदावला. पनवेलहून अलिबागला पावणेदोन तासात पोचणारी वाहने अडीच ते तीन तासांनी पोचली. वडखळ-नागोठणे, अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने जिल्हा वाहतूक शाखेला वाहतूक नियंत्रणात आणताना तारेवरची कसरत करावी लागली. दुपारी एकच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून पर्यटकांना त्यांच्या निश्‍चित स्थळी वेळेवर पोचण्यासाठी सहकार्य केले.

 
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मी कोल्हापूरला जाणार!’

गोव्याचे किनारे गर्दीने फुलले
यंदा कोरोनामुळे गोव्यात नाताळचा फारसा उत्साह नव्हता. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थनासभा झाल्या. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांच्या मेजवान्या मात्र किनारी भागात रंगल्या होत्या. पणजीच्या इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चच्या बाहेर पर्यटकांची मध्यरात्रीनंतरही मोठी गर्दी होती. दरवर्षी होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा नव्हती. पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्याने किनारी भागात वाहतूक कोंडी झाली होती.

ओ डॉक्टर, उपचार करताय की लुटताय? पाठदुखीच्या उपचारावेळी महिलेकडून उकळले 20 लाख!

Leave a Reply

Your email address will not be published.