कोविड-१९ लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचं; जाणून घ्या 

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमही वेगानं सुरु आहे. मात्र, या लसीकरण कार्यक्रमादरम्यान कोणत्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणं तसेच कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, याबाबत राज्य शासनानं काही महत्वपूर्ण संदेश जाहीर केले आहेत. हे संदेश तंतोतंत पाळणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या लसीकरण मोहिमेचा योग्य प्रकारे फायदा होऊ शकेल. 

लसीकरणादरम्यान कुठल्या बाबी समजून घ्याल?

लसीकरणाबाबत मुख्य संदेश — 

 1. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी सध्याच्या ४ ते ६ आठवड्यांवरुन वाढवून तो ४ ते ८ आठवडे करण्यात आला आहे. या ४ ते ८ आठवड्यांच्या वाढीव कालावधीपैकी जर ६ ते ८ आठवड्यांदरम्यान डोस घेतला असेल तर अधिक संरक्षण मिळू शकेल. परंतू हा मधला कालावधी ८ आठवड्यांपेक्षा जास्त वाढवू नका. 
   
 2. शासनाने इतर आजारांसह (कोमॉर्बिडीटीज) असणाऱ्या लाभार्थ्यांसह ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीकरण सुरु केलं आहे. 
   
 3. देशात लसींचा तुटवडा नाही. त्यामुळे लोकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये. लसींचे एकूण वाटप, एकूण वापर, शिल्लक लसींची संख्या आणि उपलब्धतेची आवश्यकता या साऱ्या पैलूंवर नियमित देखरेख ठेवणारी सुरळीत व्यवस्था सरकारने लागू केली आहे. 
   
 4. लस घेतल्यानंतर आपण आपल्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी) किंवा डिजिटल प्रत (सॉफ्ट कॉपी) किंवा लिंक आवर्जून मागून घ्यावी. खासगी रुग्णालयांमध्ये आपल्याकडून घेतलेल्या शुल्कामध्ये याचाही समावेश आहे. आपल्या लसीकरणानंतर ३० मिनिटांच्या निरिक्षण काळात आपण प्रमाणपत्र मिळवण्याची खातरजमा करुन घेऊ शकता. ते घेतल्याशिवाय घरी परतू नका. मात्र, रुग्णालयाने जर तुम्हाला प्रमाणपत्र दिले नाही तर १०७५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवा. 
   
 5. लाभार्थ्यांनी लसीकरणाची कोविन पोर्टलवरुन (CoWIN) ऑनलाईन लसीकरणाची वेळ (अपॉईंटमेंट) घेतली असेल तर कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात पुन्हा लसीकरणासाठी वेळ घेण्याची गरज नाही. जर एखादे रुग्णालय लसीकरणाच्या या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नसेल तर १०७५ या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला तक्रार नोंदवता येईल. 

लसीकरणाबाबत उपसंदेश – 

 1. ४५ पेक्षा अधिक वयोगटासाठी किमान १ जानेवारी १९७७ पूर्वी जन्मलेल्या व्यक्ती लसीकरणास पात्र आहेत.
   
 2. लसीच्या पहिल्या डोसनंतर ६ ते ८ आठवड्यापर्यंत अर्थात ५४ ते ५६ दिवसांनी दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेण्यास उशीर करु नका, अन्यथा तुम्हाला संसर्गाचा धोका कायम असेल.
   
 3. जरी आपल्याला दुसऱ्या डोससाठी आपोआप वेळ देण्यात आली तरीही ४ ते ८ आठवड्यादरम्यान आपण कधीही आपल्या सोयीचा दिवस आणि दिनांक ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. www.cowin.gov.in या वेबसाईटवर आपण आपली अपॉईंटमेंट बदलून घेऊ शकता. 
   
 4. कोविड-१९ विरूद्धचा लढा अजूनही सुरूच आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यावर देखील मास्क घालायला विसरू नका.
   
 5. हात धुणे हा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. लक्षात ठेवा, लसीकरण झाल्यावर देखील हातांची स्वच्छता कायम ठेवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: What to know during Covid 19 vaccination Find out

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.