कोव्हिड मदतीसाठी राज्यातील 10 मृत पोलिसांचे कुटुंबीय अपात्र

मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुंटुंबियांना मिळणारी 50 लाखांची आर्थिक मदत राज्यातील 10 पोलिसांना मिळणार नसल्याची बाब पुढे आली आहे. या 10 पोलिसांना कर्तव्य बजावताना कोरोना झाले नसल्याचे राज्य पोलिस दलाच्या पडताळणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कोरोना योद्ध्यांसाठी मिळणारी आर्थिक मदत मिळणार नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

कोरोना संकट सुरू झाल्यावर डॉक्टरांसोबत पोलिसांनीही कोरोना रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र, सामान्य नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाच मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होऊ लागली.  त्यामुळे कोरोनाबाबत कर्तव्य बजावणा-या पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत राज्य सरकारने जाहिर केली. याशिवाय मृत पोलिसाच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची घोषणाही करण्यात आली. मुंबई पोलिसांनी एक पाऊल पुढे जाऊन पोलिस कल्याण निधीतून 10 लाख अधिकची मदत जाहिर केली.

मुंबईत दररोज एक व्यक्ती 450 ते 450 ग्रॅम कचरा तयार करतो, 75 टक्के कचऱ्यात अन्न पदार्थांचा समावेश

सुरूवातीच्या काळात कोरोना मुंबईत वेगाने पसरल्याने येथे तैनात मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांची संख्याही झपाट्याने वाढली. पण त्यानंतर तातडीने पोलिसांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यात पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. मुंबईत चार कोव्हिड सेंटरची स्थापना करण्यात आली.

विविध उपाययोजनांमुळे मुंबई पोलिस दलातील कोरोनाचे प्रमाण कमी झाले. पण राज्यातील  ठाणे, नवी मुंबई व इतर ग्रामीण भागातील पोलिसांमधील कोरोनाबाधीत पोलिसाचा आकडा वाढला. राज्यभरात आतापर्यंत 247 पोलिसांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. पण त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कागदोपत्री कार्यवाही सुरू असताना त्यातील 10 पोलिस कोरोना संबंधीत कोणतेही कर्तव्यावर नसल्याची बाब तपासणीत निष्पन्न झाली आहे.

“तुंबई’ टाळण्यासाठी कल्पना; मुंबईत ठिकठिकाणी मिनी पम्पिंग स्टेशन 

हे 10 पोलिस राज्यातील विविध जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, मुंबईतील एकाही पोलिसाचा त्यात समावेश नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यातील बहुसंख्य पोलिस मोठ्या सुटीवर घरीच होते. शासकीय नियमानुसार रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किमान 14 दिवस आधी संबंधीत पोलिस कर्तव्यावर हजर असणे आवश्यक आहे. त्यातील एक दोन प्रकरणात लॉकडाऊनच्या आधीपासून काही पोलिस सुटीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एक पोलिस तर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कामावर हजर नव्हते. बाथरुममध्ये पडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपासणीत त्याला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.