गुड न्यूज : आशा, गटप्रवर्तकांना आता मिळणार मोबाईल

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाच्या महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या फिल्डवर जावून काम करत आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची 72 आरोग्यविषयक कामे करावी लागतात. त्याचे रिपोर्टिंग त्यांना दर महिन्याला करावे लागते. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने आता त्यांचे सर्व कामकाज ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना आरोग्य खात्याकडून मोबाईल देण्यात येणार आहेत. त्यासाठी 36 कोटी 62 लाखांची तरतूद करण्यात आली असून, त्याअंतर्गत राज्यातील 45 हजार 783 आशा आणि गटप्रवर्तकांना त्याचा लाभ होणार आहे. 

कोरोना महामारीच्या संकट काळात घरोघरी जावून सर्व्हे करणे, कोरोना संशयितांची माहिती जमा करणे, त्यांना उपचारासाठी पाठवणे यांसह त्यांना 72 प्रकारची वेगवेगळी आरोग्यविषयक कामे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना दर महिन्याला करावी लागतात. त्यासाठी त्यांना दर महिन्याला त्याचे रिपोर्टिंग करून अहवालही वरिष्ठांना सादर करावा लागतो. त्यासाठी त्यांना बराच वेळ द्यावा लागतो. सध्या कोरोनामुळे त्यांचे काम आणखीच वाढले आहे. त्यांना दैनंदिन कामे करून कोरोनाचीही कामे करावी लागत आहेत.

त्याचबरोबर सद्य:स्थितीत आरोग्य विभागाने काही सॉफ्टवेअर सुरू केली आहेत. ती तातडीने भरणे आवश्‍यक बनले आहे. त्याव्दारे वरिष्ठांना माहिती मिळून तत्काळ पुढील कार्यवाही करणे शक्‍य होत आहे. त्याचा विचार करून आरोग्य विभागाने आता त्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना सुमारे आठ हजार रुपयांपर्यंतचा मोबाईल देण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच आरोग्य विभागाने 36 कोटी 62 लाख 64 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार आता राज्यातील 45 हजार 783 आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना मोबाईल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कामाचा ताण कमी होणे शक्‍य 

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना सध्या 72 वेगवेगळ्या प्रकारची आरोग्यविषयक कामे आणि रिपोर्टिंग करावे लागते. त्याचबरोबर त्याचे रिपोर्टिंगही त्यांना दर महिन्याला करावे लागते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ जातो. त्यांना मोबाईल देण्यात आल्यावर त्यांनी रोजचे रिपोर्टिंग रोज करता येणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे दिवसातील काही वेळ त्या संबंधित रिपोर्टिंगसाठी देऊ शकतील आणि त्यांना महिन्याकाठी येणारा कामाचा ताण कमी होईल, असेही आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Leave a Reply

Your email address will not be published.