जागतिक महिला दिन विशेष : तिच्या जगण्याला पंख फुटले !

“यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्‍याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही आमा “ओव्हरटेक’ केले आहे. आपणही पुढे जायचे… या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. महिला आरोग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती काम करते आहे. अशा सांगली जिल्ह्यातील काही मोजक्‍या महिलांच्या धडपडीची ही गोष्ट आज जागतिक महिला दिनानिमित्त…. 

साडेचार हजार लोकांना व्यसनमुक्त करणारी साधना 
घोटभर दारू संसार जाळते. चिमुटभर तंबाखू कर्करोगाला निमंत्रण देते. एकदा का माणूस व्यसनाच्या आहारी गेला की त्याला त्या जाळ्यातून बाहेर काढणं सोपं नसतं. हे काम साधना पाटील नावाची एक महिला करतेय. शिराळा येथे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी तब्बल साडेचार हजार लोकांना व्यसनमुक्त केले आहे. गेली आठ वर्षे त्यांनी झटून साडेचार हजार संसार वाचवले आहेत.  साधना पाटील या इंग्रजी आणि मानसशास्त्र विषयाच्या दुहेरी पदवीधर आणि एमए बीएड्‌ आहेत. स्कूल मॅनेजमेंट डिप्लोमा केला आहे. पती डॉ. राजाराम पाटील यांचे शिराळा येथे रुग्णालय आहे. तेथेच त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राचा निर्धार केला. अनेक महिला रुग्ण डॉक्‍टरांकडे गरिबीचे आणि त्याला कारण ठरलेल्या व्यसनाचे गाऱ्हाणे घालायच्या. व्यसनी नवरा जगू देईना, असे सांगायच्या. त्यातून ही ठिणगी पडली. “सकाळ’ तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा म्हणून काम करतानाही त्यांनी हा प्रश्‍न समजून घेतला होता. एक महिला म्हणून त्यांच्या मनात काहूर माजले होते. व्यसनमुक्तीचा निर्धार करून त्यांनी काम सुरू केले. रुग्णालयात येणाऱ्या महिलांशी त्या व्यसनमुक्तीबाबत चर्चा करू लागल्या. तुमच्या मनात जिद्द असेल, कुटुंबाचं सहकार्य असेल, तर तुमच्या नवऱ्याची नशायात्रा आपण थांबवू, असा विश्‍वास त्यांनी महिलांना दिला. महिलांना विश्‍वास दिला. त्या नवऱ्याला घेऊन समुपदेशनासाठी यायला लागल्या. आतापर्यंत सहा हजार जणांना त्यांनी समुपदेशन केले आहे. त्यापैकी साडेचार हजार लोक व्यसनमुक्त झाले आहेत. त्या म्हणाल्या,””व्यसनमुक्ती मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक पिढ्या बरबाद होताना बघत बसणे योग्य नाही. आपण काम केले पाहिजे. 20 ते 30 वयोगटांतील मुलं वाया जात आहेत. त्यांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी मी धडपड करते आहे.’ 

फिंद्री… तिचा शब्दबद्ध संघर्ष 
स्त्री मनाची घुसमट ही पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली गोष्ट आहे. काही स्त्रिया ती सांगतात, अनेकींना ती सांगता येत नाही. स्त्रीच्या अशा या मूक घुसमटीला शब्दबद्ध करण्याचे काम “फिंद्री’ या कादंबरीतून प्रा. सुनीता बोर्डे यांनी केले आहे. त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित होतेय. “नकोशी’ म्हणजे “फिंद्री’… आई-बापाच्या मनाविरुद्ध जन्माला आलेली पोर. मराठवाड्यातील एका दलित, गरीब कुटुंबातील मुलीची ही कहाणी. तिच्या संघर्षाचा प्रवास सुनीता बोर्डे यांनी शब्दबद्ध केलाय. स्त्रीने स्वतः सक्षम झाल्यानंतर स्त्रियांच्या प्रश्‍नाला वाचा फोडावी, ज्या माध्यमातून शक्‍य आहे त्या माध्यमातून बोलावं, हीच अपेक्षा असते. त्या कादंबरीतून व्यक्त होताहेत, खरं तर व्यवस्थेवर हातोडा टाकण्याचा त्यांचा विचार आहे. व्यवस्था वाकेल की नाही माहिती नाही, मात्र तिला एक जोराचा दणका देणारी ही कादंबरी ठरेल, असा त्यांचा विश्‍वास आहे. स्त्री साहित्यिक म्हणून सुनीता बोर्डे यांचे काम लक्षवेधी राहिले आहे. “ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातील स्त्रिया’, “अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’, “भाकरीचा बंगला’, “महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्त्री सुधारणा- भाग आठ’ ही त्यांची साहित्यसंपदा आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. विद्यार्थी दशेपासून त्या चळवळीत सक्रिय आहेत. बाईनं बाईच्या पाठीशी उभं राहिलं तर तिचा सन्मान वाढेल, तिच्या जगण्याला बळ येईल, यात शंकाच नाही. “फिंद्री’तून व्यक्त होताना त्या नुसता प्रश्‍न मांडून थांबणार नाहीत, तर परिस्थितीवर मात करून उभा राहिलेल्या “फिनिक्‍स’ पक्ष्याची कथाच त्या सांगत आहेत. 

“किचन क्वीन’ अश्‍विनी 
सांगलीतील गावभागाची कन्या अश्‍विनी राऊतमारे पुण्यातील रणशिंग कुटुंबाची सून झाली. ती आर्किटेक्‍ट आणि इंटेरिअर डिझायनर. काही वर्षे त्यात काम केले, मात्र एका अपघातामुळे पायावर शस्त्रक्रिया झाली. धावपळीवर मर्यादा आल्या. लहान मुलगी सोबत. काम थांबले. त्या आपत्तीत तिने संधी शोधली. तिच्या हाताला चव होती आणि तीच कमाल करून गेली. तिने घरी केक बनवायला सुरवात केली, ते विकायला लागली. दोन वर्षांनंतर तिने त्याचे वर्कशॉप सुरू केले. त्याला इतका प्रतिसाद मिळाला की तिने “किचन क्वीन’ म्हणूनच स्वतःला पुढे आणले. केक, आईस्क्रीम, चॉकलेट, खारी, पिझ्झा, पंजाबी खाद्यपदार्थांवर तिचे प्रभुत्व. आता ती इतर महिलांना सुगरण बनवत निघाली आहे. पुणे आणि सांगलीत चाळीसहून अधिक कार्यशाळा झाल्या असून, कोरोना काळात 21 ऑनलाईन कार्यशाळा झाल्या. त्यात जगभरातील काही महिलांनी सहभाग घेतला. तिने पुण्यात किचन स्टुडिओ बनवला आहे. तिथे ती कार्यशाळा घेते. हृदयाचा मार्ग पोटातून जातो, असे म्हणतात. प्रत्येक महिलेला चविष्ट पदार्थ बनवायला शिकायचे असते. त्यात ती मदत करतेय. रसायनमुक्त, कमी तेलाचे आणि आरोग्यदायी पदार्थ बनवण्याची कला ती शिकवते. गेली पाच वर्षे हे काम सुरू आहे. तिच्याकडून खाद्यपदार्थ शिकलेल्या अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कुटुंबाला त्या हातभार लावत आहेत. 

नवयुगाची “फिटनेस गुरू’ योगिता 
प्रचंड काम आहे, वेळ नाही, धावपळ होतेय… त्यातून व्यायामासाठी वेळ काढायचा कसा? या प्रश्‍नावर योगिता पडियार या तरुणीने उत्तर शोधले आहे. तुम्ही जिथे असाल तेथे व्यायाम करू शकता. त्यासाठी जीमला जायलाच हवे, असे नाही, हा विचार तिने रुजवला आहे. या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गेली 15 वर्षे ती कार्यरत आहे. पैकी दहा वर्षांहून अधिक काळ तिने मुंबईत काम केले आहे. सिनेमा क्षेत्रातील कित्येक दिग्गजांना तिने ट्रेनिंग दिले आहे. ती म्हणते,””प्रत्येकाची शरीर रचना वेगळी, कामाचे स्वरूप, खाणे-पिणे वेगळे, वय वेगळे… त्यानुसार व्यायामाची गरज असते. त्याचा अभ्यास करून मी मार्गदर्शन करते. व्यायामात सातत्य ठेवतानाच सहज व्यायाम करता आला पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे.” कोरोना संकट काळात तिने ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यशही आले. आता सांगलीत स्वतःचा फिटनेस स्टुडिओ सुरू केला आहे. सिंगापूर, दुबई येथील लोक तिच्याकडून फिटनेस ट्रेनिंग घेतात. महिलांना व्यायामाची आवड लागावी म्हणून ती विशेष प्रयत्न करते. त्यांना दररोजचा व्याप सांभाळून हलके व्यायाम शिकवते. खेळाडूंपासून ते 80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत ज्याच्या-त्याच्या गरजेनुसार ती मार्गदर्शन करते. निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे आणि हीच नवयुगाची गरज आहे. या युगातील योगिता ही आधुनिक फिटनेस गुरू आहे. 

गोष्ट आचारी सुवर्णाताईंची… 
त्या सधन कुटुंबातील, लाडात वाढलेल्या… लग्नही सधन घरात झाले… मात्र नंतर संकटांनी पाठ घेतली. कर्जापोटी शेती विकली, जगण्याचे वांदे झाले. खचलेल्या मनाने माहेरी आल्या. उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम सुरू केले. पाककौशल्य उपयोगाला आले. या कलेने भाकरी दिलीच; शिवाय प्रपंचही नेटाने उभारला. एक डझन महिलांना त्यांनी रोजगार दिलाय. त्यांना “आत्मनिर्भर’ बनवले. सुवर्णा दादासाहेब काडापुरे त्यांचे नाव. सासर मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ, तर माहेर वारणाकाठचे माळवाडी. वडील अप्पासाहेब बोणे माळवाडीचे सरपंच होते. लग्नानंतर म्हैसाळमध्ये त्या रमल्या. शेतीवाडी, गुरेढोरे, नोकरचाकर असा सगळं होतं. अचानक त्याला दृष्ट लागली. खते, औषधांचे दुकान, किराणा व्यवसाय, मेडिकल आगीत खाक झाले. कर्जापोटी शेती, घरदार विकावे लागले. 2007 मध्ये आई-वडिलांनी आसरा दिला. शेती व पशुपालन करताना मोठी शस्त्रक्रिया झाली. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिमत कायम होती. बेंद्री-शिरगावच्या बी. के. पाटील यांनी पाककलेला प्रोत्साहन दिले. शिखरजी यात्रेनिमित्त त्यांच्या हातची चव कळाली. दिवाळी फराळ, गावोगावचे उत्सव यासह घरगुती कार्यक्रमांसाठी त्यांच्या हातचा स्वयंपाक हवा, असा आग्रह वाढला. त्यांच्यासोबत 12 महिला काम करतात. मोठा मुलगा अमोल जनावरांचा डॉक्‍टर, तर धाकटा अक्षय मार्केटिंग क्षेत्रात स्थिरावलाय. माळवाडीत घर बांधलेय. संकटावर मात करत कुटुंब पुन्हा उभं राहिलंय. 

दिव्यांग कविता इतरांची प्रेरणा 
बालपणातील आजारातून अपंगत्व आले. त्यातून मोठ्या जिद्दीने ती उभी राहिली. तुंग (ता. मिरज) येथील कविता अशोक पाटील या तरुणीची गोष्टच मोठी प्रेरणादायी आहे. एड्‌सग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही मुलगी दिव्यांग नसून, सामाजिक कार्यातील दिव्य आहे. तिने प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे. ती आता चारचाकी वाहनही चालवू लागली आहे. लहानपणी कविताच्या पाठीवर एक गाठ होती. आठ महिन्यांची असतानाच ऑपरेशन झाले, मात्र त्यात दुखापत झाली आणि आयुष्यभराचे अपंगत्व तिच्या वाटणीला आले. खूप उपचार केले, मात्र तिचे दोन्ही पाय हालत नव्हते. या स्थितीत ती लढत मोठी झाली. शिकली, सक्षम बनली. व्हील चेअरवरून ती धावते आहे. ती एमए बीएड्‌ झाली आहे. लहान मुलांच्या शिकवण्या घेते. तिचा भाऊ मदत करतो. त्यातून मिळणारी काही रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरते. राजकारणातही ती सक्रिय आहे. आता ती ग्रामपंचायत सदस्य बनली आहे. कल्पवृक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून मैत्रीण अमृता मोरे (कापसे) हिच्या मदतीने अनाथ, अपंग, एड्‌सबाधित, अवयव दान प्रबोधन, रक्तदान शिबिर, समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करीत आहे. दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून मदत उभी करते आहे. गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीयस्तरावरील शांतिदूत प्रोडक्‍शन “मिस व्हिलचेअर इंडियन कोहिनूर’ स्पर्धेसाठी तिची निवड झाली. स्पर्धेसाठी कविताला ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस अनिता राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

बाई मी, दळण दळण कांडीते गं…. 
जाती गेली, गिरण्या आल्या… पण बाईच्या जिंदगीतलं दळणं काही कमी झालं नाही. हाताला चटकं घेत घरादाराला भाकर देणाऱ्या बाईची जिंदगी ही अशी चूल आणि मूल करण्यातच गेली असली, तरी या रहाटगाड्यातूनही काही जिगरबाज आयाबायांनी त्यांची जिंदगी सोन्याची करून दाखवली. त्यातल्याच एक सोनाबाई. सोनाबाई अर्जुन बंडगर. मागील तब्बल 30 वर्षे पिठाची गिरणी चालवून त्या ताठ मानेनं आणि कण्यानं आयुष्य जगतायेत. 
पंचशीलनगरच्या चौकातली बंडगरांची गिरण म्हणजे जणू इतिहासाचा ठेवाच. 80 वर्षांपासून गिरणी सुरू आहे. सोनाबाईंचे पती गिरणी चालवायचे. नंतर त्या काम करायला लागल्या. मूळ गाव जत तालुक्‍यातलं डोर्ली. माहेर आरेवाडी. फळ व्यापाराच्या निमित्तानं सासू-सासरे इथं आले आणि स्थायिक झाले. त्यांनी गिरणी त्यावेळी सुरू केली. सोनाबाईंचं वय पंचाहत्तरी पलीकडं गेलं आहे, पण आजही गिरणी चालवतात. 10 पैसे किलो दळणाचा दर असल्यापासून गिरण चालवते. तेव्हा शांतिनिकेतन, मिल्ट्री कॅंपवेळी एकेका दिवशी ट्रकभरून धान्य दळून दिलंय. रात्रंदिवस गिरणीतच असायचे. आजही कसला त्रास नाही की दुखणं नाही, असं त्या सांगतात. 20 वर्षांत गिरण्या वाढल्या, घरगुती चक्कीही आल्या. गिरण्यांचा धंदा पार संपला. मिळकत चांगली नाही. लाईट बिलंच दोन हजार रुपये येतं. इतक्‍या वर्षाची गिरणी बंद करायची नाही म्हणूनच चालवते, अशी खंत सोनाबाई व्यक्त करतात. 

संपादन : युवराज यादव 

Leave a Reply

Your email address will not be published.