ठाकरे सरकारचा कारभार उत्तम; 40 टक्के जनतेचं मत

पुणे – राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाlतील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. यामध्ये विविध पातळीवर ठाकरे सरकारची कामगिरी कशी झाली? लोकांच्या अपेक्षांची पूर्तता ठाकरे सरकार करण्यात कितपत यशस्वी ठरलं? ठाकरे सरकार कोणत्या मुद्द्यांवर अपय़शी ठरलं याशिवाय इतर काही प्रश्न विचारण्यात आले होते. 

महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला किती गुण द्याल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये सर्वाधिक 37.6 टक्के लोकांनी 5 पैकी 5 गुण दिले असून 27.9 टक्के लोकांनी 0 गुण दिले आहेत. 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी 4 पेक्षा जास्त गुण दिले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारभार कसा वाटतो यावर 40.8 टक्के लोकांनी उत्तम असं मत नोंदवलं आहे. तर 35.6 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंचा कारभार असमाधानकारक असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय 10 टक्के लोकांनी बरा तर 13.5 टक्के लोकांनी समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे. 

देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील कोरोनाची परिस्थिती कशी हाताळली याबाबत सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कोरोनाची परिस्थिती राज्य सरकारने उत्तम हाताळल्याचं 48.3 टक्के लोकांनी म्हटलं. तर 26.4 टक्के लोकांनी वाईट असं उत्तर दिलं आहे. यामध्ये 20 टक्के लोकांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती राज्य सरकारने बरी हाताळल्याचं म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यात राज्यातील आर्थिक स्थिती आता सरकार कशी हाताळत आहे असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. त्यामध्ये 35.8 टक्के लोकांनी राज्य सरकारने आर्थिक स्थिती उत्तम हाताळल्याचं म्हटलं आहे. तसंच 24.9 टक्के लोकांच्या मते कोरोनानंतर राज्यातील आर्थिक स्थिती बऱ्यापैकी हाताळली जात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याशिवाय 32.3 टक्के लोकांनी वाईट असं मत नोंदवलं आहे. 

महाविकास आघाडी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना 52.6 टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल असं म्हटलं आहे तर 29.3 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. 18.1 टक्के लोकांनी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल की नाही हे सांगता येत नाही असं म्हटलं आहे. 

राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. विरोधीपक्ष म्हणून भाजप आपली जबाबदारी कशी पार पाडत आहे या प्रश्नावर 41.9 टक्के लोकांनी वाईट असं उत्तर दिलं आहे. तर 30.7 टक्के लोकांनी उत्तम असं म्हटलं आहे. याशिवाय 22.7 टक्के लोकांनी विरोधीपक्ष बरी कामगिरी करत आहे असं म्हटलं. 

गेल्या वर्षभरात राज्यात विविध समस्या निर्माण झाल्या. त्यापैकी कोणते प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये शेतकरी समस्या, सामाजिक आरक्षण, कायदा सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांचा समावेश होता. यापैकी कोणताच प्रश्न राज्य सरकारला योग्यरित्या हाताळता आला नाही असं मत 45.3 टक्के लोकांनी नोंदवलं आहे. तर शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यरित्या हाताळल्याचे 28.9 टक्के लोकांनी म्हटलं आहे. याशिवाय कायदा सुव्यवस्था नीट हाताळल्याचं 22 टक्के लोकांचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यात गेल्या वर्षभरात आणखी कोणत्या मुद्द्यांवर काम करायला हवे होते असं विचारण्यात आलं होतं. यामध्ये सर्वाधिक शेती आणि उद्योग धंद्यामध्ये सरकारने लक्ष घालायला हंव होतं असं म्हटलं आहे. शेतीमध्ये 34.6 टक्के तर उद्योग धंद्यात 34.2 टक्के काम करायला हवं होतं असं मत नोंदवलं आहे. तर 22.1 टक्के लोकांनी आरोग्य आणि 9.1 टक्के लोकांनी सरकारने शिक्षण क्षेत्रात काम करायला हवे होते असे म्हटले.

महिलांच्या सुरक्षिततेकडे महाविकास आघाडी सरकारने पुरेसं लक्ष दिलं का या प्रश्नावर 47.7 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. यामध्ये 38.8 टक्के लोकांनी नाही असं म्हटलं आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेकडं लक्ष दिलं की नाही हे सांगता येत नसल्याचं 13.5 टक्के लोकांनी म्हटलं.

केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संबंध समाधानकारक आहेत असे आपल्याला वाटते का? या प्रश्नावर तब्बल 77 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं असून 12.3 टक्के लोकांनी हो म्हटलं आहे. याशिवाय 10.7 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं आहे. 

केंद्र सरकारकडून पुरेसा निधी मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी ठरते आहे असं वाटतं का? या प्रश्नावरसुद्धा नाही असं मत सर्वात मोठ्या प्रमाणावर नोंदवलं आहे. 57.3 टक्के लोकांनी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यात य़शस्वी ठऱत नसल्याचं म्हटलं आहे तर 25.5 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. 17.5 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.