डंख कोरोनाचा : महापालिकेसाठी झिजले, “कोरोना’त एकटेच लढून हरले

सोलापूर : सत्यजितने यावर्षी दहावीची परीक्षा दिली. त्याच्या आयुष्यातील बोर्डाची पहिलीच परीक्षा असल्याने आपल्या मुलाला किती गुण मिळणार? याची उत्सुकता त्याच्या आई-बाबांना होती. दहावीचा निकाल लागला आणि सत्यजितला 60 टक्के गुण मिळाले. गुण मिळाले पण मिळालेले गुण ऐकण्यासाठी त्याचे बाबा हयात नाहीत. ज्या बाबांना दहावीचे गुण सांगण्यासाठी सत्यजित आसुसला होता त्याच सत्यजितने आता महापालिकेत वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. स्वप्नातही विचार न केलेली परिस्थिती आज सत्यजितवर ओढवली आहे. कोरोनाचा डंख किती क्रूर आणि थोडीही दया-माया दाखवणारा नसतो याचीच जाणीव साळुंके कुटुंबाची आजची स्थिती पाहिल्यावर येते. 

सोलापुरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सोलापूर महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातील लिपिकावरच कोरोनाने डंख मारला आहे. साळुंके सरकारी कर्मचारी असतानाही त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना कोरोनाच्या संकटात पदोपदी झगडावे लागले. जेवढा संघर्ष त्यांनी व त्यांच्या परिवाराने कोरोनासोबत केला तेवढाच संघर्ष त्यांनी महापालिका, रुग्णालय व्यवस्थेसोबतही केला. साळुंके यांच्या उपचारासाठी झालेला खर्च महापालिका किंवा शासन करेल, त्यामुळे त्यांचा तो आर्थिक भार हलकाही होईल. परंतु खासगी नोकरी करणारे, व्यावसायिक, शेतकरी यांना मात्र कोरोनावरील उपचारासाठी येणारा दवाखान्याच्या बिलाचा मोठा खर्च पुढील काही वर्षे तरी निश्‍चितपणे सोसावा लागेल. 1994 पासून साळुंके महापालिकेच्या सेवेत आले. जिवात जीव असे पर्यंत ते महापालिकेसाठी झिजत राहिले. महापालिकेची नोकरी करताना त्यांचे कधी कधी कुटुंबाकडे आणि एकुलत्या एक मुलाकडेही दुर्लक्ष झाले. ज्या महापालिकेसाठी ते आयुष्यभर झिजत राहिले, महापालिकेसाठी आपल्या कुटुंबांकडे वेळप्रसंगी दुर्लक्ष केले त्याच महापालिकेचा वाईट अनुभव त्यांच्या कुटुंबाला येत आहे. 

एकाच कार्यालयात आपल्यासोबत रोज काम करणारा आपला एक सहकारी ज्यांनी गमावला ते देखील साळुंके यांच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती का दाखवत नाहीत? असाच प्रश्‍न पडू लागला आहे. नगरसचिव कार्यालयात काम करणाऱ्या साळुंके यांच्याकडे शेवटच्या टप्प्यात महापौरांच्या स्वीय सहाय्यक पदाचीही अतिरिक्त जबाबदारी आली होती. कोरोनाच्या विळख्यात सोलापूरच्या महापौर, सोलापूरचे आयुक्त यांच्यासह महापालिकेतील बहुतांश कर्मचारी आले होते. त्यातूनच साळुंके यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्‍यता आहे. त्रास होऊ लागला म्हणून 4 जुलैला साळुंके सोलापुरातील रुग्णालयात ऍडमिट झाले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला म्हटल्यावर त्यांच्या पत्नी आणि मुलाचीही कोरोना चाचणी करण्यात आली. घरातील कर्ता माणूस दवाखान्यात कोरोनासोबत लढतोय म्हटल्यावर त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या पत्नीने त्यांना घरातच क्वॉरंटाईन करण्याची विनंती केली. साळुंके यांच्याकडे भाड्याचे टु बीएचकेचे घर असल्याने घरातच त्यांना क्वारंटाईन करणेही शक्‍य होते.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती धुडकावून लावली. साळुंके यांच्या पत्नी आणि मुलाला क्वारंटाईन सेंटरवर क्वारंटाईन करण्यात आले. 
कोरोनाचा डंख किती निर्दयी असतो याचा प्रत्यय साळुंके परिवाराने या काळात घेतला. पती दवाखान्यात कोरोनाशी झुंजतोय. त्यांची पत्नी आणि मुलाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये केले होते. अशा काळात साळुंके यांच्याकडे लक्ष द्यायचे कोणी? महापालिकेचे तर कोणीही फिरकत नाही म्हटल्यावर साळुंखे यांच्या नातेवाइकांची प्रचंड चिंता वाढली. मदतीला धावून येईल असे ओळखीचे कोणीही सोलापुरात नव्हते. अशा दुर्दैवी स्थितीत मदत मागायची तरी कोणाला? असा प्रश्‍न पडलेल्या साळुंके यांच्या नातेवाइकांसाठी रेणुकानगरीमधील साळुंके यांचे शेजारी असलेले वैभव वाघमारे देवासारखे धावून आले. साळुंके यांच्या परिवारासाठी नातेवाइकांकडून येणारी आर्थिक मदत असो की त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली त्यांच्या नातेवाइकांना कळविणे ही सर्व जबाबदारी वैभवने पार पाडली. नातेवाइकांनी पाठविलेली मदत वैभवने साळुंके यांच्या परिवाराला पोहोच केली. वैभवचे आणि साळुंके परिवाराचे नाते तसे दोन ते तीन वर्षांपूर्वीचे. वैभवने ते नाते जपले, संकटाच्या काळात मदतीला धावून आले. ज्या महापालिकेसाठी साळुंके झिजले त्या महापालिकेचे कोणीही साळुंके परिवाराच्या वाईट काळात आले नाही. फक्त शेजारी एवढ्याच एका धाग्याची जाण ठेवत वैभव हे साळुंके यांच्या कुटुंबासाठी धावून आले. 

साळुंके यांच्या पत्नी व मुलाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यांना क्वारंटाईन सेंटरमधून सोडण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही त्यांना खरी चिंता होती राजेंद्र साळुंके यांचीच. राजेंद्र साळुंके यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने ते या संकटातून बरे व्हावेत यासाठी साळुंके कुटुंब देवाकडे हात जोडत होते, विनवण्या करत होते. 28 जूनला रुग्णालयात दाखल झालेल्या राजेंद्र साळुंके यांनी 22 जुलैपर्यंत कोरोनाशी एकतर्फी झुंज दिली. कोरोनाच्या या लढाईत त्यांची ही एकाकी झुंज अपयशी ठरली. एकुलत्या एक मुलाला सोडून ते देवाघरी निघून गेले. जवळपास 26 वर्षे त्यांनी महापालिकेची सेवा केली परंतु स्वतः:साठी हक्काचे घर ते उभा करू शकले नाहीत. सोलापुरात ते भाड्याच्या घरातच रहात होते. साळुंके त्यांच्या परिवाराला सोडून गेले. त्यांच्या परिवाराचा खरा जीवन संघर्ष आता सुरू झाला आहे. रहायला हक्काचे घर नाही, आपल्या व्यथा कोणाला सांगाव्यात असा हक्काचा माणूस जवळ नाही. त्यातच पतीच्या निधनानंतर मिळणारी मदत मिळविण्यासाठी आवश्‍यक असलेली प्रशासकीय माहिती नाही. साळुंके आज हयात नाहीत परंतु गृहिणी असलेली त्यांची पत्नी आणि दहावी उत्तीर्ण झालेला मुलगा यांच्या भविष्याचा प्रश्‍न मात्र आजही कायम आहे. 

ज्या महापालिकेसाठी ते झिजले त्या महापालिकेचा एक कर्मचारी, अधिकारी अन्‌ पदाधिकारी त्यांच्या वाईट काळात धावून आला नाही. कोरोनाने मारलेल्या डंखची जेवढी सल साळुंके कुटुंबाच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या मनाला बोचते तेवढीच सल महापालिकेने कोरोनाच्या संकटात त्यांना वाऱ्यावर सोडल्याचीही आहे. साळुंके सरकारी कर्मचारी असल्याने त्यांना शासकीय मदत मिळेलही. परंतु ही मदत करताना पती गमावलेल्या पत्नीचा आणि बाप गमावलेल्या मुलाचा आत्मसन्मान महापालिकेने राखावा. सर्वसामान्यांच्या नशिबी येणारे हेलपाटे किमान या परिवाराच्या नशिबी तरी येऊ नयेत एवढीच अपेक्षा. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची सुरवात सोलापूर शहरापासून झाली. सर्वाधिक मृत्यूदर म्हणून काही काळ सोलापूर देशात चर्चेत होते. कोरोनाशी दोन हात करताना कोरोनाचा डंख बसल्यावर साळुंके कुटुंबाची जी अवस्था झाली. तशीच अवस्था उद्या आपलीही होऊ शकते या भीतीने भेदरलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा आणि विश्‍वास देण्याची आवश्‍यकता आहे. साळुंखे यांच्याप्रमाणेच कोरोनाचा डंख ज्या-ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना बसला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्यासाठी महापालिकेने तत्काळ स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. त्या कुटुंबांना लवकरात लवकर आणि कमी त्रासात मदत उपलब्ध करून देणारी यंत्रणा तयार करावी. कोरोनाच्या लढाईत आपले काही बरे वाईट झाले तरीही आपल्या कुटुंबाला आपली महापालिका आणि शासन वाऱ्यावर सोडत नाही असा विश्‍वासच महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये व इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी महापालिका पदाधिकारी, अधिकारी व जिल्हा प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल एवढीच अपेक्षा. 

महापालिकेने पाठविला प्रस्ताव 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पन्नास लाख रुपयांच्या विमाकवच योजनेचा लाभ साळुंके यांच्या परिवाराला मिळावा यासाठी महापालिकेने शासनाला प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या शिवाय साळुंके यांना देय असलेल्या रकमा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी व इतर ज्या काही रक्कमा आहेत त्या वेळेत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्त शिवशंकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.