…तोवर उसतोड कामगारांनी कोयता म्यान ठेवावा, पंकजा मुंडेंचं आवाहन

मुंबई : दरवर्षी उसतोड कामगारांचा करार असतो. हा करार करताना त्यांच्या मजुरीत वाढ, ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी कोरोना झाला तर सुविधा, त्यांना पत्नी गर्भवती असतील तर त्यांच्यासाठी योजना, उसतोड कामगारांमध्ये मुलींची लग्न लवकर केली जातात. त्यांच्यासाठी काही योजना आणणे यावर सकारात्मक चर्चा सुरु आहे, तोवर उसतोड कामगारांनी कोयता म्यान ठेवावा, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक ठिकाणी कारखानदारांचेही प्रश्न आहेत. कारखानदारांनाही एफआरपी,मानधनवाढ द्यावी लागते. उद्योग जगला तरच मजूर जगेल, असंही मुंडे म्हणाल्या. ते एबीपी माझाच्या ‘प्रश्न महाराष्ट्रा’चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

पंकजा मुंडेंच्या मते मुख्य तीन प्रश्न कोणते?

या चर्चेत पंकजा मुंडे यांना मुख्य तीन प्रश्नांबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, कोरोनाचा वाढता प्रभाव हा मोठा प्रश्न आहे. कोरोनामुळं झालेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना आणि तरुणाईसमोरील शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न हे तीन प्रश्न महत्वाचे आहेत. राज्य सरकार या प्रश्नांवर फार समाधानकारक काम करत नाही. महाराष्ट्र कोरोनावर काम करण्यात कमी पडतंय, राज्यात कोरोनाची स्थिती फार गंभीर आहे. कोरोनाची जी आकडेवारी येतेय ती फार चिंताजनक आहे. या सरकार कमी पडत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
महाविकास आघाडीत तीन बलाढ्य पक्ष कारभार हाकत आहेत. त्यांच्याकडे अनुभव मोठा आहे. त्यांना काही सांगणं मी योग्य ठरणार नाही. पक्षांच्या प्रश्नांपेक्षा या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष घालावं. तीन पक्षाचं सरकार चालवणं सोपं काम नाही. प्रशासन हाताळताना पक्ष बाजूला ठेवून काम करणं गरजेचं आहे, असं मुंडे म्हणाल्या.

माझ्यात चांगली उमेद आहे. मी नाउमेद नाही. 
पंकजा मुंडे या मतदातसंघात जात नाहीत, लोकांमध्ये जात नाहीत? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, मी फिजिकल डिस्टन्सिंग पाळतेय. माझं ऑफिस सुरु आहे. तिथं काम सुरु आहे. मतदारसंघातील प्रश्न मतदारसंघात जाऊनच सोडवावे लागतात असं नाही. मी राज्याचा कारभार पाहिला आहे, काम केलंय. भेटायला गेलं की कार्यकर्ते गर्दी करतात. माझ्याकडे आता काही पद नाही, त्यामुळं मी गेल्यानं काही फरक पडत नाही. मी ऑनलाईन पद्धतीनं सगळं सांभाळत आहे. उलट लोकं मला म्हणतात ताई तुम्ही काळजी घ्या. मी पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असते. हा विषयच वेगळा आहे. या काळात एखाद्या ठिकाणी आपल्या जाण्याने वर्दळ होत असेल तर  अशा वेळी जनतेत न जाणं हाच उपाय आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, उसतोड कामगारांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर मी या काळात संबंधित मंत्र्यांशी बोलले आहे. फिजिकल डिस्टन्स मी नाही पाळला तर कोण पाळणार. कोरोनाचा काळ संपल्यावर मी पुन्हा मैदानात दिसेल. तिथे बसून जर कोरोना आटोक्यात आला असता तर कोरोना एवढा वाढला नसता, असं मुंडे म्हणाल्या.

धनगर आरक्षणाचा विषय भिजत घोंगडं. आम्ही विरोधात असताना आंदोलनं केली. सत्तेत असताना काही योजना आणल्या. समाजाचा लढा आजही चालूच आहे, असंही मुंडे म्हणाल्या.

प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमातील अन्य महत्वाच्या बातम्या

राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे : संजय राऊत

इतर राज्यांच्या तुलनेत केंद्रानं महाराष्ट्राला दुप्पट दिलंय : प्रवीण दरेकर

सरकारसाठी कोरोना हाच मुख्य मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला : गुलाबराव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published.