दिलासादायक…केवळ दोन टक्केच रुग्ण गंभीर

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने साडेतीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मृतांचा आकडाही १२ हजारांवर गेला आहे. राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी ९७ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असून, त्यातील अनेक जण लक्षणविरहित आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण फक्त २ टक्के आहे आणि १ टक्के ‘आयसीयू’मध्ये उपचार घेत असून, त्यांना व्हेंटिलेटरवरवर ठेवण्यात आले आहे. 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून, महिलांचे कमी आहे. त्यामुळे पुरुषांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील पुरुषांमध्ये अधिक आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त असून महिलांमध्ये कमी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३,४७,५०२ (२० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यातील ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

कोरोनामुळे थांबले ‘देणाऱ्यांचे हजारो हात’; सामाजिक संस्थांची झाली ‘दुबळी झोळी!’​

३१ ते ४० वयोगटाला धोका अधिक 
२१ ते ३०, ३१ ते ४० आणि ४० ते ५० या तीन वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे. आतापर्यंत राज्यात ३१ ते ४० वयोगटातील ६६ हजार ८११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ ४० ते ५० वयोगटातील ५८ हजार ४६५, तर २१ ते ३० वयोगटातील ५७ हजार ७१२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

मुलांना सांभाळा
राज्यात ० ते १० वयोगटातील १२ हजार ५९१ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे प्रमाण ३.८६ टक्के एवढे असून, त्यातही आजारात गुंतागुंत वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत लहान मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. ११ ते २१ या वयोगटातील २२ हजार ३४५ मुला- मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यांचीच चाचणी केली जायची. आता सर्वांचीच चाचणी होत असल्याने ५० ते ६० टक्के बाधितांना लक्षणे नसल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढले असले तरी याचा फारसा परिणाम मृत्यूंमध्ये किंवा रुग्णालयांवर होणार नाही. फक्त त्यांच्याद्वारे दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाइन करून ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे संसर्ग रोखता येऊ शकतो.
– डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू विश्‍लेषण समिती प्रमुख

(Edited by : Kalyan Bhalerao)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *