दिवाळीत खाद्यपदार्थ, मिठाईतील भेसळ थांबवण्यासाठी FDAचे धाडसत्र

मुंबई: दिवाळीत खाद्यपदार्थ मिठाईतील भेसळ थांबवण्यासाठी एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरु केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केवळ एका आठवड्यात केलेल्या कारवाईत राज्यातून जवळपास सव्वा चार कोटींचे भेसळयूक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहे.

दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते. तर याच वाढणाऱ्या विक्रीचा फायदा भेसळखोर घेताना दिसतात. तेव्हा या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. 

एका आठवड्यात एफडीएने तब्बल सव्वा चार कोटीच्या अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यात 12 टन खवा, 3561 किलो मिठाई, 46 हजार किलो रवा-मैदा-तेल-तूप तर 40 हजार 638 किलो इतर अन्न पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सुरक्षित साजरी करण्यासाठी अशी खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. त्यानुसार , यंदाही राज्यभरात या विशेष तपासणी मोहिमेला सुरुवात झाली असून जोरात कारवाई सुरू असल्याची माहिती शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली आहे.

अधिक वाचा-  मुंबईत गेल्या 24 तासात 726 नवे कोरोना रुग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर
 

या कारवाईनुसार, 62 ठिकाणी छापे टाकत 12 टन खवा-मावा जप्त करण्यात आला आहे. या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत 6 लाख 37 हजार 889 अशी आहे. मिठाईतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे खवा-मावा. त्यामुळे दिवाळीत सर्वात जास्त मागणी ही खवा-माव्यालाच असते. तर खवा-मावा हा शेजारच्या गुजरात, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर येतो. तर परराज्यातून येणारा हा खवा-मावा सर्वाधिक असुरक्षित, भेसळयुक्त असतो. त्यामुळे खवा-मावाविरोधात या काळात जोरदार कारवाई होते. रवा, बेसन, तेल-तूप ही काळजी घेत करा खरेदी -खवा-माव्यानंतर तयार मिठाई आणि फराळासाठीच्या कच्च्या मालात अर्थात रवा, मैदा, बेसन, तेल-तूप, डाळी अन्य पदार्थांमध्येही मोठी भेसळ होते. त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने असे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या रवा, बेसन, मैदा, तेल-तूप अशा अन्नपदार्थांचा 46 हजार 504 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.

तर 641 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. तर या साठ्याची एकूण किंमत 1 कोटी 87 लाख 45 हजार 918 इतकी आहे. महत्वाचे म्हणजे 641 पैकी 6 नमुने आतापर्यंत असुरक्षित आढळले आहेत. मिठाईचे ही 350 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून असुरक्षित आणि भेसळीचा अंदाज व्यक्त करत 3561 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. या मिठाईची किंमत 6 लाख 32 हजार 750 इतकी आहे.  

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याव्यतिरिक्त मसाला, मीठ, साखर, चहा पावडर, जिरे-मिरे असे अन्य पदार्थ ही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. याचे तब्बल 1136 नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. तर 40 हजार 628 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत 2 कोटी 98 लाख आहे, असे केकरे यांनी सांगितले आहे. 

नागरिकांना ‘एफडीए’चे आवाहन

जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मात्र त्याचवेळी ही दिवाळी सुरक्षित दिवाळी म्हणून साजरी करण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखत आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केकरे यांनी केले आहे. एफडीए कारवाई करत आहेच पण नागरिकांनी मिठाई, खवा-मावा आणि इतर अन्न पदार्थ घेताना काळजी घ्यावी. नोंदणीकृत, परवानाधारक आणि ओळखीच्या विक्रेत्यांकडूनच ही खरेदी करा. तर खरेदी बिल घ्या. पाकिटावरील सर्व माहिती वाचून घ्या. मुख्य म्हणजे मुदत तपासून घ्या. मिठाई किती तासात खायची हे तपासून त्या वेळेतच मिठाईचे सेवन करा. रंग, चव, वास तापसुन मिठाई, खवा-मावा आणि इतर अन्न पदार्थ खरेदी करा. तर सर्वात महत्वाचे म्हणजे काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित एफडीएशी संपर्क करावा, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.

——————————

(संपादन- पूजा विचारे)

FDA campaign stop adulteration of food and sweets on Diwali

Leave a Reply

Your email address will not be published.