धक्कादायक! अधिवासाच्या लढाईत संपताहेत वाघ, तीन महिन्यात ११ वाघांचा मृत्यू

नागपूर : राज्यात वाघांची संख्या वाढल्याने वन्यजीव प्रेमींच्या चेहरे फुलले असताना गेल्या तीन महिन्यात अकरा वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला वाघीण आणि तिच्या गर्भातील तीन बछडय़ांच्या मृत्यूने झाली. त्यापाठोपाठ आता उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन बछड्यांचा, पेंचमध्ये अवनीच्या बछड्याच्या मृत्यूसह चार वाघांचा मृत्यू अधिवासाच्या झुंजीत झाल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच वाघांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा – नवनीत राणा यांना चक्क खासदाराने दिली धमकी; आरोप करताना काय म्हणाल्या
महाराष्ट्रात नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीचा गर्भातील तीन बछडय़ासह मृत्यू, २१ जानेवारीला मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघिणीचा मृत्यू, २७ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वनक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यातही वाघांच्या मृत्यूची दोन प्रकरणे समोर आली. आठ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात, नऊ फेब्रुवारीला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघाचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पामधील अवनीचा बछडा, उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील दोन बछड्या पाठोपाठ वर्धा जिल्ह्यातील केळझर जवळील नाल्यात एका वाघाचा मृत्यू झाला. २०१८ पासून तर आत्तापर्यंत भारतात ३०९ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यातील सर्वाधिक ८८ मृत्यू मध्यप्रदेशात, ६० मृत्यू महाराष्ट्रात तर ४१ मृत्यू कर्नाटक राज्यात झाले आहेत. उर्वरित मृत्यू हे इतर राज्यातील आहेत.
हेही वाचा – तो म्हणाला, ‘माझी भूक भागली’; लैंगिक शोषण करून पत्नीला सोडलं वाऱ्यावर; दर्यापुरातील घटना…
अधिवासासाठी वाघांचा संघर्ष वाढू लागला आहे. अधिवास आणि तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढवण्यावर भर देऊन समतोल साधावा लागणार आहे. ज्या भागात वाघांची संख्या अधिक आहे तेथील संख्या कमी करणे आणि वाघ नाहीत त्या परिसरात वाघ वाढविण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे.
-नितीन देसाई, संचालक वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया.
मृत्यू झालेल्या वाघांची संख्या –
वर्ष | मृत्यू पावलेले वाघ |
२०१८ | १९ |
२०१९ | २२ |
२०२० | १६ |
२०२१- मार्च पर्यंत | ११ |
संपादन – भाग्यश्री राऊत