धक्कादायक! महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा क्रमांक देशात सर्वात वरचा

नागपूर  महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि नागपूर शहरातून सर्वाधिक महिला बेपत्ता होतात. दुसऱ्या क्रमांकावर पश्‍चिम बंगाल तर तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २५ हजारांपेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या आहेत.

महिला बेपत्ता होण्याच्या अनेक कारणांमध्ये विवाहबाह्य प्रेम संबंध हे एक महत्त्वाचे कारण आहे. विवाहबाह्य प्रेम संबंधातून संसार तुटण्याचे प्रमाण अलिकडे बरेच वाढले आहे.

उपराजधानीतून आतापर्यंत ४०२ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी विवाहित महिला, तरूणी, शाळकरी मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊन काळात १३१ जण बेपत्ता झाले आहेत, हे विशेष.

बेपत्ता होण्यामध्ये ७० टक्के तरूणी आणि विवाहित महिलांचा समावेश आहे. १४ ते १८ या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अल्पवयात होणारे प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या मुलींच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. तसेच विवाहित महिलांच्या विवाहबाह्य संबंधातून अनेक संसार विस्कळीत होत आहेत.

आपल्या कुटुंबाचा, लहान मुलांचा आणि सामाजिक बदनामीचा विचार न करता विवाहित महिला दुसऱ्या विवाहित तरूणासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतात आणि संधी मिळताच दोघेही पळून जातात. अशा अनेक घटना उपराजधानीत समोर आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून दरवर्षी जवळपास १२०० मुले, मुली, महिला आणि वृध्द बेपत्ता होतात. परंतु, त्यापैकी परत सापडणाऱ्यांचे प्रमाण केवळ ९ ते १० टक्के आहेत. पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार झाल्यानंतर पोलिसांवरील कामाच्या ताणमुळे मिसींग तक्रारीच्या फाईल्स अनेक दिवस पेंडींग ठेवल्या जातात.

सविस्तर वाचा – धक्कादायक! दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन? नागपूरच्या कंपनीची  ५२ किलो स्फोटके काश्मिरात आढळली

देशातून ४ लाख महिला बेपत्ता
पोलिस विभागाच्या नोंदीनुसार आतापर्यंत देशातून ४ लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. भारतातून दररोज ४०० महिला, मुली, मुले आणि वृद्ध बेपत्ता होण्याची नोंद होते. अनेक मुली देहव्यापारात ढकलल्या जातात तर मुलांचा भीक मागण्यासाठी वापर केला जातो. पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन स्माईल’ राबविले होते. त्यावेळी बेपत्ता झालेल्यापैकी ६० टक्के व्यक्तींना शोधण्यात यश आले होते.

संपादन – स्वाती हुद्दार

Leave a Reply

Your email address will not be published.