धारावीतून सांगलीत आलेल्या 21 जणांपैकी महिला आणि बारा वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या धारावीतून 21 जण सांगलीला आले होते. विनापरवाना हद्दीत प्रवेश केल्याने त्यांना ताब्यात घेऊन क्वॉरन्टाईन करण्यात आलं. त्यापैकी एक महिला आणि 12 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

मुंबई : मुंबईतील धारावी इथून सांगली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 21 जणांमधील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. धारावीतून सांगलीत आलेली एक महिला काल (22 मे) रात्री पॉझिटिव्ह आली होती. आता त्यापैकी बारा वर्षांची मुलगीही कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. सध्या या मुलीला सध्या मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

विनापरवाना हद्दीत आल्याने इस्लामपूरच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांनी तातडीने दोन दिवसापूर्वी 21 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर इस्लामपूर पोलीस ठाण्यात चार जणांवर तर कासेगाव पोलीस स्टेशन मध्ये 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मिरजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली, त्यात एका 37 वर्षीय महिलेचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला तर आज 12 वर्षीय मुलीच अहवाल आज पॉझिटिव्ह आला. उर्वरित लोकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

काय आहे प्रकरण?
बुधवारी (20 मे) रात्री 10 वाजता धारावी येथून हे 21 जण सांगलीला यायला निघाले. हे सर्व मुंबईच्या न्यू धारावी, फ्रॅजिक कॅम्प या भागातील रहिवासी आहेत. 21 तारखेला रात्री उशिरा त्यांना कराड इथल्या चेकपोस्टवर पोलिसांनी अडवले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने ही बस मागे पाठवण्यात आले. काही अंतरावर मागे जाऊन हे सगळे खाली उतरले. बस धारावीला पाठवली आणि हे चालत चालत पुन्हा कराडच्या दिशेने आले. काही काळ विश्रांती घेऊन त्यातील चौघे पुढे इस्लामपुरात आले. हे लोक परत येऊन आपल्याला घेऊन जातील या आशेने बाकीचे मागेच थांबले होते. नंतर मात्र त्यांनी शेतातून चोरवाटेने मार्ग काढत कासेगावपर्यंत आले.

दरम्यान मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना फोन आला की इस्लामपुरात चार लोक धारावीमधून आले आहेत. त्यांनी तातडीने जाऊन चार जणांकडे चौकशी केली असता सगळे मिळून 21 लोक आल्याचे समजताच प्रशासनाचे धाबे दणाणले होते. मात्र तातडीने कारवाई करत सगळ्यांना ताब्यात घेतल्याने कोणालाही शहरांमध्ये प्रवेश करता आला नाही. परिणामी या लोकांमध्ये कोरोनाचा होणारा संभाव्य धोका पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *