निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला आव्हान, खंडपीठात याचिका

औरंगाबाद : निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.येत्या १५ जानेवारीला राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, सदस्यांसाठीच्या आवश्यक त्या प्रवर्गांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीही काढण्यात आल्या होत्या.

मात्र, सरपंच पदासाठी काढलेल्या सर्व सोडती रद्द करत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ डिसेंबरला कोल्हापूर येथे जाहीर केला होता. जातींच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे, बनावट प्रमाणपत्र सादर करणे, पुन्हा निवडणूक घ्यावी लागणे आदी कारणे त्यांनी हा निर्णय जाहीर करताना दिली होती. १६ डिसेंबरला राज्याच्या ग्रामविकास विभागाने या स्वरूपाचा आदेशही जारी केला आहे.

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अॅड. विक्रम गोकुळराव परभणे यांनी या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका अॅड. देविदास शेळके यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली आहे. निवडणुकीनंतर सोडत काढल्यास संबंधित गावात मागास समुदायाऐवजी केवळ निवडून आलेल्या उमेदवारासाठीच पद आरक्षित होईल, त्यामुळे घटनेच्या अनुच्छेद १४ चा भंग होत असून एकूण आरक्षण धोरणाचा हेतूच मोडीत निघत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

अनुच्छेद २४३ (ड) चाही भंग होत असल्याचं याचिकेत म्हटले आहे. सदस्यांसाठी आधीच आरक्षण जाहीर झाले आहे. सदस्यपदासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढणाऱ्यांनाही अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर घेण्यासाठी दिलेल्या सर्व सबबी सदस्यपदासाठीच्या आरक्षणासाठीही लागू पडतात. त्यामुळे सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय पूर्णपणे अतार्किक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घटनाबाह्य म्हणून घोषित करावा, १० डिसेंबरपूर्वी काढलेल्या सोडतीमधील आरक्षण कायम करून उर्वरित ग्रामपंचायतींसाठीची सोडत निवडणुकीपूर्वीच घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर सात जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Edited – Ganesh Pitekar

Leave a Reply

Your email address will not be published.