पंढरपुरात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय’

पंढरपूर : आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाणार आहे, असं आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.

विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं, यावर विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, मागच्या वर्षी जितकी लोकं पंढरपुरात मृत्यूमुखी पडली त्यापेक्षा कमी लोकं यंदा मृत झाली आहेत, त्यामुळं कोरोनाची भीती दाखवू नका, असंही त्यांनी सूचित केलं.

यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांचं बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.

मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन केलं. वंचितच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला आले. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली होती.

नाकाबंदीमुळे मोजकेच कार्यकर्ते पंढरपुरात
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकऱ्यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती.

मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकऱ्यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. आता यावर मुख्यमंत्री पातळीवर विचार सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकऱ्यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे

पाच महिन्यांपासून मंदिरांसह धार्मिक स्थळे बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-कीर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती. याच मागणीला पुढे नेत विठ्ठल मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरी यांनी केली. त्यासाठी 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात 1 लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासनातर्फे अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.