पर्यटनाला तीन हजार कोटींचा फटका; लॉकडाउनचा परिणाम

पुणे – लॉकडाउनचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. गेल्या चार महिन्यांत सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे राज्यात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिणामी अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांचे कंबरडे मोडले असून, त्यावर अवलंबून असलेले पर्यायी उद्योगही बंद पडले आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांतील टूर मॅनेजर भाजी किंवा खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत.
पर्यटनावर देशात सर्वाधिक खर्च महाराष्ट्रात होतो; परंतु यंदा एप्रिल, मे, जून या सिझनच्या काळात पर्यटक घरातच बसून होते. सुमारे 40 टक्के व्यवसाय त्या काळात होतो. पर्यटनावर हॉटेल, विमान, रेल्वे वाहतूक, रेस्टॉरंट, गाइड, ड्रायव्हर आदी अनेक घटकांचा व्यवसाय अवलंबून असतो. लॉकडाउनमुळे त्यांच्यावर उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधण्याची वेळ आली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील टूर गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत जिल्हाबंदी आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र गेल्या चार महिन्यांपासून ठप्प आहे. शहरातील काही मोठ्या कंपन्यांच्या एजंटांनी त्यांचे आऊटलेट बंद केले आहेत, तर अनेकांनी भाडेत्त्वावर घेतलेली ऑफिसेस बंद केली आहेत. काहींनी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
लॉकडाउन संपल्यावर सुरुवातीला बिझनेस क्लासचा प्रवास सुरू होईल. त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले, तर दिवाळीच्या सुट्यांत पर्यटनाचा “ट्रेंड’ काही प्रमाणात सुरू होईल.
-मिलिंद बाबर, मॅंगो हॉलिडेज
टूर अँड ट्रॅव्हल्सची कार्यालये चार महिन्यांपासून बंद आहेत. पहिली दोन ते तीन महिने कर्मचाऱ्यांना आम्ही सांभाळून घेतले. सुरुवातीला पूर्ण पगार, नंतर अर्धा पगार दिला; परंतु त्यालाही आता मर्यादा आल्या आहेत. ही परिस्थिती कर्मचाऱ्यांनाही समजत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी भाजी-खाद्यपदार्थ विक्री किंवा अन्य व्यवसाय शोधले आहेत.
-अखिलेश जोशी, गिरीकंद ट्रॅव्हल्स
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
चार महिन्यांच्या लॉकडाउनमुळे नागरिक घरात बसून कंटाळले आहेत. त्यांना फिरायचे आहे; परंतु जिल्हा बंदीमुळे ते शहराबाहेर पडू शकत नाहीत. तसेच कोरोनाची भीती त्यांना वाटते. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध होण्याची सगळे जण वाट पाहत आहेत. ती जर आली अथवा कोरोना नियंत्रात आला तर, चार महिन्यांत पर्यटन क्षेत्र पुन्हा बहरेल.
– विवेक गोळे, भाग्यश्री ट्रॅव्हल्स
महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र
5000 – टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर
7 हजार कोटी – वार्षिक उलाढाल
2000 – पुणे, मुंबईतील ट्रॅव्हल्स कंपन्या
70,000 – कर्मचारी, एजंट