पश्चिम बंगाल, केरळच्या धर्तीवर प्राध्यापकांना वेतन द्या; ‘मासू’ची उदय सामंतांकडे मागणी

पुणे : राज्यातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, कोरोनामुळे त्यांच्यापुढे संकटे निर्माण झाली आहेत. या पदांची कायमस्वरूपी भरती होईपर्यंत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या धर्तीवर “११ महिने कंत्राटी पद्धतीवर नेमून मासिक किमान २५००० ते ३०००० हजार रुपये मानधन देण्यात यावे,” अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासू)उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. 

– विज्ञानप्रेमींसाठी सुवर्णसंधी! जगातल्या सर्वांत मोठ्या व्हर्चुअल विज्ञान महोत्सवात सहभागी व्हा!

महाराष्ट्रातील तासिका तत्वावर काम करण्याऱ्या अध्यापकांनी कोविड १९ च्या महामारीने लादलेल्या टाळेबंदीमुळे उध्दभवलेल्या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी मासूने पुढाकार घेतला आहे, असे ‘मासू’चे अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. 

कायमस्वरूपी प्राध्यापकांना मासिक ६५ हजार ते एक लाखापेक्षा जास्त पगार मिळतो. तेवढा पगार तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांना वर्षाला मिळतो, त्यामुळे ही असमानतेची दरी दूर करण्यासाठी “तासिका तत्त्वावरील अध्यापकांना कायमस्वरूपी तत्वावर रुजू करून घ्यावे”

– कात्रजचे दूध महागणार! पुणेकरांच्या खिशाला नववर्षापासून लागणार कात्री​

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र भरातून सुमारे १५००० ते २०००० अध्यापकांची सैद्धांतिक, प्रात्यक्षिके इत्यादी कामांकरीता तात्पुरती (एक वर्षाचा करार पद्धत) नियुक्ती करून त्यांना अभ्यांगत/तासिका तत्वावर मानधन प्रदान करण्यात येते परंतु मार्च २०२० पासून ते आजतागायत म्हणजेच १० महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये कोरोनाच्या महामारीपासून सावधानी बाळगण्यासाठी बंद आहेत.

– विद्यार्थ्यांनो, MHT-CET परीक्षेच्या तारखा जानेवारीत होणार जाहीर!

अध्यापकांचा एक वर्षांचा करार केव्हाच संपुष्ठात आलेला असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी नवीन करार वा मुदतवाढ अद्यापही करण्यात आलेली नाही. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ बाबत कोणतेही नियोजन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अजून जाहीर केलेले नाही त्यामुळे सेट, नेट, एमएफील, पीएचडी अश्या उच्च शिक्षित अध्यापकांवर आता स्वतः कसे जगायचे आणि आपल्या कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू आणि काश्मीर राज्यांमधील तासिका तत्त्वावरील अध्यापक कायमस्वरूपी तत्वावर कार्यरत नाहीत परंतु त्यांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करून त्यांना मासिक २५ हजार ते ३० हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अध्यापकांची अवस्था तर बत से बत्तर झालेली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी हा चांगला उपाय आहे, असे विभागप्रमुख सिद्धार्थ तेजाळे  यांनी सांगितले.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *