पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे पंधरा दिवसात एक माता अन् दोन बालकांचा मृत्यू

पालघर : जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हे अतिदुर्गम तालुके ओळखले जात असून ह्या भागात मोठ्या प्रमाणात कुपोषणाचेही प्रमाण आहे. ह्या भागात गेल्या पंधरा दिवसांत शासनाच्या आणि आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे एका मातेला आणि दोन नवजात बालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर प्राण गमावलेल्या बालकाची माता सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमले गावातील मनीषा दोरे (वय 25) या गर्भवती महिलेचा 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळलेल्याने उपचारा दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. डिजीटल इंडियाचा नारा दिला जात असला तरीही ह्या गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नसल्याने डोंगरातील टेकडीवर चढून 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधाला. त्यानंतर तब्बल अडीच तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र, तोपर्यंत ह्या मातेची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे नाशिकपर्यंत पोचल्यावरही बाळाला आणि मातेला आपले प्राण गमवावे लागले. काही दिवसांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी ह्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

शुक्रवारी पुन्हा अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली. जव्हार मधील पिंपळशेत खरोंडेपैकी हुंबरण येथील कल्पना राजू रावते या 24 वर्षीय महिलेने वेळीच उपचार न मिळाल्याने आपल्या बाळाला गमावलं. ती सध्या रुग्णायलात मृत्यूशी झुंज देत आहे. कल्पना यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नसल्याने पायी चालत टेकडीवर जाऊन रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र, रुग्णवाहिका न पोहचल्याने या महिलेला डोलीमध्ये नेण्यात आलं. डोलीमधून नेत असताना जंगलात कल्पना यांची प्रसूती झाली. मात्र, त्याच ठिकाणी बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर कल्पना यांना मध्यरात्री दोन वाजता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून कल्पना ह्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

पालघर मधील जव्हार मोखाडा दुर्गम भागात या पंधरवड्यात आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे दोन महिलांना आपल्या बाळांना गमवावं लागलं असून यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला मृत्यूशी झुंजत आहे. त्यामुळे डिजीटल इंडिया करू पाहणाऱ्या सरकारने आधी ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची ही दुरावस्था सुधारावी हीच माफक अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published.