पिकांच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत! 25 हजारांहून अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

सोलापूर : विदर्भातील नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जून ते ऑगस्ट या काळात नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना वेळेत मदत करता येईल, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील सर्वच विभागीय आयुक्‍तांना दिले. त्यांच्याकडून तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आली. मात्र, अद्याप एकाही जिल्ह्याचा पंचनामा अहवाल सरकार दरबारी प्राप्त झालेला नाही.

नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला पूर आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागला. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतानाही अद्याप पंचनामेच झालेले नाहीत. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांमधील सुमारे 23 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या 42 हजार हेक्‍टरवारील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. दरम्यान, 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह त्यांच्या क्षेत्राची माहिती शासनाने मागवूनही मिळालेली नाही. दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणत्याही आदेशाची वाट न पाहता पंचनामे करण्यात येतात. मात्र, तसे न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

अद्याप पंचनामे अहवाल प्राप्त झालेले नाहीत​
जून ते ऑगस्ट 2020 या काळात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे तत्काळ करावेत, असे पत्र सर्व विभागीय आयुक्‍तांना दिले आहे. मात्र, अद्याप पंचनामे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. पंचनामे प्राप्त झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात शासनाकडून मदत केली जाईल. 
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

मदत व पुनर्वसन विभागाचे पत्र गुंडाळले 
राज्यात जून ते ऑगस्ट 2020 या काळात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. ही बाब निर्दशनास आली असून अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे संयुक्‍त पंचनामे करावेत. 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची माहिती, क्षेत्र, बाधित शेतकरी यांची माहिती तत्काळ द्यावी, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सर्व विभागीय आयुक्‍तांना पाठविले. मात्र, अद्याप एकाही जिल्ह्यातून पंचनाम अहवाल प्राप्त झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *