पुणेकर ठरविणार पदवीधर, शिक्षक आमदार; पाच जिल्ह्यांपैकी सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात 

पुणे – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतदार यादी जिल्हा प्रशासनाकडून अंतिम करण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघातील यादी पाहिल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात पाचही जिल्ह्यात मिळून सर्वाधिक मतदार हे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुण्याचे पदवीधर आणि शिक्षक आपला आमदार ठरविणार आहेत. 

पदवीधर मतदार संघात मतदारांची संख्या 4 लाख 25 हजार 257 एवढी आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात म्हणजे 1 लाख 36 हजार 611 एवढे आहेत. त्या खालोखाल याच मतदार संघात कोल्हापूर आणि सांगली येथील मतदारांची संख्या आहे. शिक्षक मतदार संघात एकूण 71 हजार 973 पैकी सर्वाधिक म्हणजे 32 हजार 201 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याने पुणे, कोल्हापूर येथील मतांवर उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मनसेच्या उमेदवार ऍड. रूपाली पाटील या केवळ पुणे शहरातील उमेदवार आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार हे सोलापूरमधील आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर हे कोल्हापूरचे आहेत. मनसेचे विद्याधर मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे हे पुण्यामधील उमेदवार आहेत. या दोन्ही मतदार संघांतील उमेदवारांची भिस्त पुणे शहरावर आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान कसे होईल आणि ते आपल्या पक्षाला कसे होईल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवीधर मतदार संघ जिल्हानिहाय मतदार 
पुणे – 1 लाख 36 हजार 611 
कोल्हापूर – 89 हजार 529 
सांगली – 87 हजार 233 
सातारा – 59 हजार 71 
सोलापूर – 52 हजार 745 

शिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार 
पुणे – 32 हजार 201 
सोलापूर – 13 हजार 12, 
कोल्हापूर – 12 हजार 237 
सातारा – 7 हजार 711 
सांगली – 6 हजार 812 

Leave a Reply

Your email address will not be published.