पुण्यासह 12 जिल्ह्यांनी गाठली सरासरी; दुष्काळी मराठवाड्याला चांगला दिलासा 

पुणे – पालघर, मुंबई उपनगर, अकोला आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये पहिल्या महिन्यातच मॉन्सूनच्या पावसाने ओढ दिली. पुण्यासह 12 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने सरासरी गाठली. विदर्भ आणि दुष्काळी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. 

केरळमध्ये 1 जूनला मॉन्सून दाखल झाला. राजस्थानपर्यंतचा त्याचा नेहमीचा 37 दिवसांचा प्रवास यंदा त्याने फक्त 25 दिवसांमध्ये पूर्ण केला. जूनच्या मध्यावधीत महाराष्ट्रात पोचलेल्या मॉन्सूनने पंधरा दिवसांमध्ये सुरुवातीचे काही दिवस जोर धरला होता. त्यानंतर उत्तरेकडे वाटचाल सुरू केलेल्या मॉन्सूनने महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मात्र दडी मारली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यात मॉन्सून दाखल होण्यापूर्वी अरबी समुद्रात “निसर्ग’ चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील या दोन हवामान उपविभागांत 1 ते 30 जूनदरम्यान पडणाऱ्या पावसाने सरासरी ओलांडली; तर कोकण आणि विदर्भात तेथील सरासरी गाठली, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

-पावसाने सरासरी न गाठलेले जिल्हे (उणे 59 ते उणे 19 टक्के कमी पाऊस) 
मुंबई उपनगर, पालघर, अकोला, यवतमाळ. 

-सरासरी गाठलेले जिल्हे (सरासरीच्या तुलनेत उणे 19 ते 19 टक्के पावसाची नोंद) 
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, नंदुरबार, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड. 
—– 
-सरासरी ओलांडलेले जिल्हे (सरासरीपेक्षा 20 ते 59 टक्के पावसाची नोंद) 
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशीम, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद. 
—– 
-सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झालेले जिल्हे (सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस) 
सोलापूर, नगर, औरंगाबाद, बीड, लातूर, जालना. 
……….. 
राज्यातील हवामान अंदाज 
-1 आणि 2 जुलै : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मराठवाड्यात तसेच, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता 51 ते 75 टक्के 
— 
-3 आणि 4 जुलै: संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता 51 ते 75 टक्के 

इशारा 
कोकण आणि गोव्यात येत्या बुधवारी (ता. 1) तुरळक ठिकाणी जोरदार; तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारी (ता. 2) कोकणात जोरदार; तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *