पुन्हा अजितदादा-चंद्रकांतदादांमध्ये जुंपणार, आमदार फोडाफोडीचे ठरणार निमित्त

शिर्डी ः उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझे चांगले मित्र व कार्यक्षम नेते आहेत. मात्र, भाजपचे आमदार फोडण्याएवढी शक्ती त्यांच्यात नाही. तसे असते, तर आमच्या 80 तासांच्या सरकारसाठी ते जेवढे आमदार सोबत घेऊन आले होते, ते त्यांना टिकविता आले असते. त्यांनी आमचे आमदार फोडणार, अशी गमतीशीर विधाने करू नयेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. 

पाटील यांनी आज सायंकाळी येथे येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, गजानन शेर्वेकर आदींनी साईप्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. 

हेही वाचा – रोहित पवार-राम शिंदे यांच्यात जुंपणार

पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, “”दादांनी राज्य चालवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू. ते सध्या बोलत आहेत, तसे जाहिरपणे बोलून आमदार फोडले जातात का? आम्हीही तसे म्हणू शकतो.” शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरे कारशेडबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावर केलेल्या भाष्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, “”तुम्ही अतिक्रमण करायचे. त्या विरोधात न्यायालयात जायचे नाही का, न्यायालयाने निकाल द्यायचा नाही का, दिला तर तो तुम्हाला मान्य नाही का, देशात घटनेनुसार केंद्र-राज्य संबंध, न्यायालये आणि कायदे, अशी रचना आहे. ती तुम्हाला मान्य नाही का?” 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्यास निकालावर त्याचा परिणाम होईल का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, “”एक अधिक एक अधिक एक, यांची बेरीज तीन होते. याचा अर्थ सरळ असा, की तीन राजकीय पक्ष एकत्र आले, तर त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत फायदा होईल. मात्र, भाजप सर्व ताकदीनिशी या निवडणुका लढणार आहे.” 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराला एक लाख 20 हजार मते मिळाली. याचा अर्थ तिन्ही राजकीय पक्षांना प्रत्येकी 43 हजार मते मिळाली. भाजपला एकट्याला 73 हजार मते मिळाली. मात्र, निवडणुकीत असे विश्‍लेषण करून चालत नाही. अधिक मते मिळवितो, तो विजयी होतो, असे पाटील म्हणाले. 

“उठा’, “शपा’ म्हणणार नाही 
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, “”राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते एकमेकांना ट्रोल करताना मर्यादा पाळत नाहीत. मला “चंपा’ म्हटलं गेलं; मात्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “उठा’ किंवा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना “शपा’ असे कधीही म्हणणार नाही. कारण, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *