‘पेट्रोलच्या दरवाढीचे स्पष्टीकरण द्या’

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्वस्त झाल्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतात कशा? हे अनाकलनीय गणित केंद्र सरकारने देशाला समजावून सांगावे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वाढत्या इंधन दराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होताना त्यांनी हे विधान केले. यासंदर्भात ते म्हणाले की, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर निश्चित केल्या जातात; पण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरते, तेव्हाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जातात. तिकडे भाव कमी होणार, तरीही आपल्याकडे भाव वाढणार, हे गणित लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. त्यामुळे केंद्राने याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज त्यांनी विशद केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याच्या थापा मारून सत्तेत आलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने मागील सहा वर्षांत केवळ सर्वसामान्य जनतेचा खिसा कापण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८७ रुपये, तर डिझेलचा दर ७९ रुपयांवर गेला आहे. आज क्रूड ऑईलचा एक बॅरल ४१ डॉलरला मिळतो. काँग्रेसच्या काळात एका बॅरलचा दर ११० डॉलरवर गेला होता. तरीही पेट्रोल-डिझेल इतके महागले नव्हते, असेही चव्हाण या वेळी म्हणाले.