भाषा कन्नड असली तरी आत्मा मराठीच : कर्नाटकातील मंत्र्यांच्या वक्‍तव्यावर पडसाद 

सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व गृहमंत्री बसवराज बोह्मयी यांनी बेळगावमधील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, तर याउलट सोलापूर, सांगली जिल्ह्यातील कन्नड भाषिक भाग आम्ही हिसकावून घेणार असल्याचे वक्‍तव्य करीत कर्नाटक-महाष्ट्राच्या सीमेवादाला पुन्हा फोडणी दिली. या त्यांच्या वक्‍तव्यावर सीमा भागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आमची मातृभाषा कन्नड असली तरी आमचा आत्मा हा मराठीच आहे. आम्ही कर्नाटकात जाणार नाही. कर्नाटकाच्या मंत्र्यांनी विनाकारण वाद उफाळून काढत सीमावर्ती भागातील नागरिकांच्या भावनेची अवहेलना करु नये, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. 

हेही वाचाः बोरामणी विमानतळाच्या स्वतंत्र अधिकारी ! वीसपैकी आठजणांच्या जमिनीची खरेदी ; 15 ररुवारीपर्यंत पूर्ण होणार संपादन 

संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रचे मंत्री बेळगाव येथे गेले असता कर्नाटक पोलिसांनी अरेरावी करत त्यांना बेळगावमध्ये प्रवेश देण्यास विरोध केला. यावेळी संबंधित महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे सांगूनही पोलिसांनी ऐकले नाही. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत कर्नाटक पोलिसांचा निषेध केला, तर कन्नड वेदिके, कर्नाटक रक्षणा विदिकेच्या सदस्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत कर्नाटकातून बेळगाव महाराष्ट्रात जाउ देणार नाही, अशी घोषणाबाजी केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री येडियुरप्पा व गृहमंत्री बसवराज बोह्मयी यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील कन्नड भाषिक भाग हिसकावून घेण्याची भाषा केली आहे. यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड भाषिक असलेल्या मराठी माणसांच्या भावना अतिशय तीव्र होत असून, कर्नाटक सरकारच्या विरोधात चळवळ उभी केली जात आहे. 

काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री….. 
महाजन समितीने बेळगाव प्रश्‍नावर अंतिम अहवाल दिला असतानासुद्धा सीमावाद उफाळून काढत महाराष्ट्र शासन उद्धट वर्तन करीत आहे. यातून राजकीय अशांतीबरोबरच सीमा भागातील नागरिकांचे मनौधैर्य खालावत आहे. बेळगाव तर सोडाच कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही. राज्याच्या गडीनाड भागात मराठी व कन्नड भाषिक एक ाच आईच्या मुलांप्रमाणे गुण्यागोविंदाने राहत आहेत. असे असतानाही हा वाद कशासाठी उकरुन काढला जात आहे, देवजाणे. सौहार्दपूर्ण वातावरणात वावरणाऱ्या सीमा भागातील नागरिकांना मनस्ताप होईल, असे वर्तन कोणीही करु नये आणि आज त्याची गरजही नाही. 

कर्नाटक सरकारच्या पोकळ अफवा 
कर्नाटकात जाण्याच्या अफवेने पिडीत असलेली ही तिसरी पिढी आहे. पहिल्या पिढीने नकार दिला. दुसऱ्यांनी या मागणीला झिडकारले. आता पुन्हा तिसऱ्या पिढींना यासाठी आग्रह करण्यात येत आहे. काही तरी बोलायचे म्हणून कर्नाटक सरकार हा विचार करत आहे. यात काहीच तथ्य नाही. केवळ या पोकळ अफवा आहेत. त्या पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकात जायची कोणाचीही इच्छा नाही. कर्नाटक सरकारने तो विचार सोडून द्यावा. 
सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्य मंत्री 

जनतेला महाराष्ट्राचा अभिमान 
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सोलापूर आणि सांगली जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. हे जिल्हे कर्नाटकला जोडण्याची मागणी करण्यापेक्षा कर्नाटकात असलेल्या मराठी बांधवावरील अत्याचार कमी करावा. त्यांना योग्य न्याय व सुरक्षितता द्यावी. महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रात सुरक्षितता असून, सरकार त्यांच्या कायम पाठीशी राहण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून इथल्या जनतेला महाराष्ट्राबद्दल गर्व आणि अभिमान आहे. 

मुझ्झमील काझी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस, मंगळवेढा 

काही तरी उकरून काढण्याचे राजकारण 
कोणता तरी मुद्दा लपविण्यासाठी काहीतरी उरकून काढण्याची राजकारण्यांची पद्धत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. आधी नियोजन आणि जनमत घेउन अशी घोषणाबाजी करावी. कारण नसताना सीमा भागातील सोलापूर, सांगली जिल्ह्यातील गावे कर्नाटकात घेण्याचा कर्नाटक सरकारने केलेला विचार अव्यवहार्य आहे. सीमा भागातील जनता महाराष्ट्रात रुळलली आहे. येथील परंपरा या माणसांच्या रक्‍तारक्‍तात भिनलेली आहे. ती माणसे कर्नाटकात कशाला जातील. कर्नाटक सरकार काय तुघलकी आहे का? काहीही घोषणा करायला. वादाचे मुद्दे सोडून विकासाचा कास धरावा. आपला देश एकसंघ आहे, त्याला तसेच ठेवण्याचा प्रयत्न सगळ्याच राज्यांनी करावा. 

गुरुनाथ गोविंदे, ग्रंथपाल, स्वातंत्र्यवीर सार्वजनिक वाचनालय  

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *