मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले; दीड वर्षात दोन मंत्र्यांची गच्छंती; कॅबिनेटमध्ये सातपैकी पाचच मंत्री शिल्लक

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले आहे. कॅबिनेटमध्ये आता सातपैकी पाचच मंत्री विदर्भातील शिल्लक राहिले आहे. वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेस टाळाटाळ केली जात असून वैदर्भीयांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटर बॉम्बवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने देशमुख यांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा त्यांची भक्कम पाठराखण केली. परमबीरसिंग यांनी केलेले आरोप, या दरम्यान अनिल देशमुख होम क्वारंटाईन असल्याने त्यांच्यावरच बालंट टळल्याचे बोलले जात होते.

जाणून घ्या – अत्याचारानंतर विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; ‘हेल्थ चेकअप’मध्ये आले सत्य पुढे

उच्च न्यायालयानेसुद्धा परमबीरसिंग यांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे देशमुख दोन दिवसांपासून चांगलेच खूश होते. हा विषय संपला असेच सर्वांना वाटत होते. या दरम्यान विरोधकांच्या आरोपातील धारही कमी झाली होते. त्यामुळे आघाडी सरकार शाबूत असे पर्यंत अनिल देशमुख यांच्या पदाला धोका नाही असेही त्यांचे समर्थक दावे करीत होते. मात्र, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देऊन देशमुखांना चांगलचा धक्का दिला.

त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय देशमुखांना पर्याय राहिला नाही. याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. यासाठी देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तसेच सीबीआय चौकशीला लागणारा वेळ लक्षात घेता अनिल देशमुख यांना किमान सहा महिने लाल दिव्याशिवाय राहावे लागणार आहे.

अधिक वाचा – कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी यापूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार अडचणीत येऊ नये यसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेऊन प्रकरण शांत केले. विशेष म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोडांवर गुन्हा दाखल झालेला नाही. फक्त शंका आणि तोंडी आरोप त्यांच्यावर होते. काही दिवस भूमिगत राहिल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, लॉकडाउनच्या काळात शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तोच राठोडांच्या अंगलट आला. 

राजकारणात पाय ठेवल्यापासूनच डोक्यावर लालदिवा

अनिल देशमुख यांनी राजकारणात पाय ठेवला तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यावर लालदिवा मिरवत होता. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. युतीच्या काळात मंत्री होते. महाविकासआघाडीच्या १५ वर्षांच्या काळात एक वर्षांचा अपवाद वगळता देशमुख सलग १४ वर्षे मंत्री होते. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर देशमुखांना राष्ट्रवादीने गृहमंत्री करून पहिल्या रांगेत बसवले होते. मात्र, अवघ्या दीड वर्षांतच वादामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.