मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा दणका; गारपिटीने पिके झाली उद्‌ध्वस्त

पुणे – राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने शुक्रवारी  (ता. १९) दणका दिला. औरंगाबाद, जालना, बुलडाणा, परभणी, अकोला, नाशिक, वाशीम, नगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली. पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, द्राक्षे, कलिंगड, पपई अशा पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील भोगगाव, बानेगाव (ता. घनसावंगी) येथे गारपीट झाली. तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत अनेक भागांत शनिवारीही पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारी दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातही हजेरी लावली. मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यात कुरहा परिसरात गारपीट झाली. जिल्ह्यात मेहकर, देऊळगांव राजा तालुक्यात जोरदार वारा व पाऊस झाला असून, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील वडगाव, उखळी, निळा परिसरात गारपीट झाली.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, गारपीट सुद्धा झाली. मेहकर, मालेगाव तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील तुपेवाडी येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीने नुकसान झालेल्या कांदा व शेडनेट हाऊसची उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे, तालुका कृषी अधिकारी व्ही एस ठक्के यांनी आज पाहणी केली.

बुलडाणा जिल्ह्यात २८११ हेक्टरवर नुकसान
शुक्रवारी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुमारे ४५०० शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ११५९ हेक्टरचे नुकसान मेहकर तालुक्यात झाले आहे. याशिवाय देऊळगावराजामध्ये ७९२ हेक्टर, बुलडाण्यात ४२२ हेक्टर, सिंदखेडराजामध्ये १५८ हेक्टर, नांदुऱ्यात १०२ हेक्टरवर तर चिखलीमध्ये ५८, मोताळा ३८, मलकापूर ८२ हेक्टरचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुमारे १०० गावांत हे नुकसान झाले आहे. 

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे झाले नुकसान

  • कांदा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांना फटका
  • कांदा बीजोत्पादन प्लॉटचे नुकसान
  • पपई, द्राक्ष, केळी, आंबा बागांना फटका
  • वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली 
  • जोराच्या वाऱ्याने शेडनेटचे नुकसान
  • जनावरांसाठी ठेवलेला चारा भिजला

गारपीट झालेली ठिकाणे

  • औरंगाबाद – राजूर, भोकरदन, फुलंब्री 
  • बुलडाणा – कुरहा
  • परभणी – वडगाव, उखळी,  निळा 
  • जालना – पिंपळगाव रेणुकाई, भोगगाव, बानेगाव, सिपोरा बाजार, बोरगाव जहाँगीर

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.