‘मन की बात’मध्ये बीडच्या ‘रॉकी’चा उल्लेख करताना भावूक झाले पंतप्रधान मोदी

मुंबई : पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, 30 ऑगस्ट रोजी देखील ते ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आज बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपण एक भावनिक दृश्य पाहिलं असेल, ज्यात बीड पोलिस दलाने श्वान रॉकीला सन्मानाने अंतिम निरोप दिला होता. रॉकीने 300 हून अधिक केसेसमध्ये पोलिसांना मदत केली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी मोदी यांनी सोफी आणि विदा या श्वानांचही कौतुक केलं. ते म्हणाले की, हे दोन्ही भारतीय लष्कराचे श्वान आहेत. आणि त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या देशाचे रक्षण करताना, आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टेने पार पाडले यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. भारतीय जातीमध्ये मुधोल हाउंड आहे, हिमाचली हाउंड या चांगल्या जाती आहेत. यांच्या पालनपोषणाचा खर्चही तुलनेने कमी असतो. आता आपल्या सुरक्षा संस्थांनी या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकामध्ये समाविष्ट करण्यास प्रारंभ केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

बीडच्या रॉकीचं 15 ऑगस्ट रोजी निधन

बीड आणि बीड बाहेरच्या जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. मागच्या 8 वर्षापासून रॉकी बीड पोलिसांच्या मदतीसाठी काम करत होता, मात्र आजारपणामुळे त्याचं 15 ऑगस्ट रोजी निधन झालं. रॉकीने 2016साली कर्नाटकच्या मैसूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. खून आणि दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्याचा तपास रॉकीने लावला होता. त्याच्या निधनानंतर  बीड शहरातील एसपी ऑफिसमध्ये पोलिसांनी रॉकीला मानवंदना वाहिली. अगदी कोरोणाच्या संकटकाळात सुद्धा सोशल डिस्टंसिंग कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण रॉकीला देण्यात आले होते.

[embedded content]

कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली

कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशात प्रत्येक सणाला संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन 
साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

टीम अप फॉर टॉइज

ते म्हणाले की, जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, अभियानामध्ये आभासी खेळ असो खेळण्यांचे क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला #AatmaNirbhar बनवायचे आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झाले होते, त्याला आता, #AatmaNirbharBharat च्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

एक अॅप आहे- ‘आस्क सरकार’ यामध्ये चॅट बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेवू शकता, असंही पंतप्रधान यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.