मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम ऊर्जामंत्री करत आहेत, वीरेंद्र पवार यांचा आरोप

मुंबई : मागील काही दिवसांपासून विविध माध्यमांशी बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आम्ही मराठा समाजातील एसइबीसी प्रवर्गातील मुलांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांना आम्ही वीज वितरण विभागात सामावून घेऊ असं आश्वासन दिलं आहे. प्रत्यक्षात मात्र ऊर्जा विभागाकडून जे परिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यामध्ये मात्र मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यामुळे एसइबीसी प्रवर्गातील मुलांना सोडून इतर प्रवर्गातील मुलांना घेतलं जाईल असं स्पष्ट लिहिलं आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतय की ऊर्जामंत्री मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मुळात आमचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही लवकरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची शिष्टमंडळाला सोबत घेऊन जाऊन भेट घेणार आहोत. यासोबतच त्यांच्या या आश्वासनाबाबत लेखी देखील मागणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समनव्यक वीरेंद्र पवार यांनी दिली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत वीरेंद्र पवार बोलत होते. वीरेंद्र पवार म्हणाले की, काही दिवसांत महावितरण कंपनीमधील अनुक्रमे उपकेंद्र सहायक, पदवीकाधारक शिकाऊ अभियंता आणि पदवी धारक शिकाऊ अभियंता यापदी निवड झालेल्या मुलांच्या जागा भरण्यात येणार आहेत. ही पदभरती करताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विविध माध्यमांशी बोलताना माहिती दिली की आम्ही आगामी भरती प्रक्रियेत मराठा समाजातील मुलांवर कसलाही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही एसईबीसी प्रवर्गातील मुलांना देखील या भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेऊ. प्रत्येक्षात मात्र महावितरण विभागाकडून जे परिपत्रक काढण्यात आलं आहे यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की, आगामी पदभरतीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थिगिती मिळाल्यामुळे आम्ही मराठा समाजातील एसइबीसी प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना या पदभरतीत समाविष्ट करून घेणार नाही. त्यांच्या जागा आरक्षणाचा निर्णय येई पर्यत तशाच ठेवल्या जातील. या संपूर्ण विषयावरून आम्ही या निर्णयात स्पष्टता आणण्यासाठी लवकरच नितीन राऊत यांची भेट घेऊ. मागील काही दिवसांतील घडामोडींबाबत बोलताना वीरेंद्र पवार म्हणाले की, मशाल मार्चच्या वेळी आम्हांला आश्वासन देण्यात आलं होतं की, पुढील 3 ते 4 दिवसांत तुम्हांला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट करून देण्यात येईल. मात्र 15 दिवस उलटून देखील काहीच हालचाल झालेली नाही.

सध्या महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला धीर देण्याऐवजी खड्ड्यात टाकण्याचं काम सुरू आहे. आम्ही महावितरणच्या भरती प्रक्रियेबाबत लवकरचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊ आणि लेखी अश्वासन देखील घेऊ. कायदेशीर पातळीवर ते टिकेल का याची खातरजमा देखील लागलीच करून घेऊ. यासोबतच वैद्यकीय प्रवेशाबाबत सरकारने समोर येऊन भूमीका मांडण गरजेचं आहे. घोषणा करण्यात आली आहे की एसइबीसी प्रवर्गातील मुलांचे शैक्षणिक शुल्क आम्ही भरू मात्र अद्याप याबाबत समोर येऊन भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहोत. मराठा जोडो अभियानातून आम्ही सर्वांना एकत्र करत आहोत. लवकरच आमची पूढील भूमिका जाहीर करू. रविवारी मराठा जोडो अभियानाचा तिसरा टप्पा असून आम्ही वाशी ते कळवा मराठा जोडो अभियान राबवणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published.