मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास माजीमंत्री आमदार देशमुख देणार राजीनामा 

सोलापूर ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी 58 मोर्चे काढले. याचे फलित समाजाला मिळाले होते. आमच्या सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करून आरक्षण दिले. उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आपण कमी पडलो असे वाटते. मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत. आमदारकीपेक्षा समाज महत्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज सोलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने जुळे सोलापुरातील डी मार्ट येथून आमदार देशमुख यांच्या घराकडे मोर्चा काढला. त्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. त्यावेळी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधला. आरक्षणाविषयीची बाहू सर्वोच्च न्यायालयात ठोस पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी जे करावे लागेल ती करण्याची आपली तयारी आहे. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी समाजाची भावना आहे. माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही, त्यासाठी आपण कोणताही त्याग करू, असेही देशमुख म्हणाले. मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल, असे वाटत नाही, असेही देशमुख म्हणाले. दरम्यान, डी मार्ट येथून निघालेल्या मोर्चामध्ये राजन जाधव, श्रीकांत डांगे यांच्या अनेक मराठा समाजातील कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. 
 

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *