मराठी साहित्य संमेलन मार्चमध्ये अन् पसंती नाशिकला, आठ जानेवारीला निश्‍चित होणार संमेलनस्थळ

औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बहुचर्चित बैठक औरंगाबादेतील ‘मसाप’मध्ये रविवारी (ता. तीन) पार पडली. या बैठकीत संमेलनाच्या यजमानपदाबाबत निश्‍चिती झाली नाही. परंतु, नाशिकमध्ये संमेलन होण्याची दाट शक्यता आहे. तशी पसंतीही देण्यात आली असून हे संमेलन मार्चमध्ये होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आजच्या बैठकीत संमेलनस्थळ निश्‍चित करण्यासाठी निवड समिती स्थापन झाली. ही समिती नाशिक येथे स्थळ निवडीसाठी सात जानेवारीला भेट देईल. त्यानंतर आठ जानेवारीच्या बैठकीत संमेलन कोठे होईल याची महामंडळ शिफारस करणार आहे.

रविवारी झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील होते. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेसह, अंमळनेर व नाशिक येथून दोन असे संमेलन घेण्याबाबतचे एकूण चार प्रस्ताव प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. यावर निर्णय अपेक्षित होता. परंतु आज केवळ स्थळ निवड समिती सदस्यांची निवड करण्यात आली. आगामी आठ जानेवारीला होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत संमेलन कुठे होणार याबाबतची घोषणा होणार आहे.

आजच्या बैठकीत कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी २०१९-२० चा अंकेक्षित अहवाल सादर केला. तसेच २०२०-२१ च्या आर्थिक नियोजनाला मान्यता देण्यात आली. महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कपूर वासनिक यांना कार्योत्तर मान्यता देण्यात आली. तसेच ‘अक्षरयात्रा’ संपादक मंडळासही मान्यता देण्यात आली. बैठकीत प्रा. उषा तांबे, उज्ज्वला मेहंदळे, प्रतिभा सराफ, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, विलास मानेकर, प्रदीप दाते, गजानन नारे, कपूर वासनिक हे महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.

‘सरहद’च्या प्रस्तावाचा विचार नाही
‘सरहद’ संस्थेने दिल्लीत मराठी साहित्य संमेलन घेण्याबाबत निमंत्रण प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता. त्यावर विचार झाला नाही. तसेच हे संमेलन मार्चमध्ये होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

स्थळनिवड समितीतील मान्यवर
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रतिभा सराफ (मुंबई), प्रदीप दाते (वर्धा), प्रकाश पायगुडे (पुणे).

संपादन – गणेश पिटेकर

Leave a Reply

Your email address will not be published.