महाराष्ट्रात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन; मुंबई, पुण्यात आढळले रुग्ण

मुंबई – गेल्या एक वर्षभरात जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आता कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने खळबळ उडाली आहे. हा नवा स्ट्रेन आता महाराष्ट्रातही पोहोला असून ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांमध्ये नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सध्या ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे. या विशेष चाचणीत राज्यातील 8 जणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली असून सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021
राजेश टोपे यांनी म्हटलं की, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
हे वाचा – पुण्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव; ब्रिटनहून आलेला एक जण पॉझिटिव्ह
देशात संख्या 38 वर
ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनमुळे जगात भितीचे वातावरण पसरले असून तो कोरोना संसर्गाच्या तुलनेत ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो, असे तज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात नव्या स्ट्रेनबाधित लोकांची संख्या ३८ वर पोचली आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर देखरेख केली जात असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे.
हे वाचा – कोरोना काळातही 85 वर्षीय आई ठणठणीत ! कोरोनाने शिकविला निरोगी राहण्याचा मूलमंत्र
सोमवारपर्यंत देशातील स्ट्रेन बाधितांची संख्या ३८ वर पोचली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. यात अनेक जण बाधित असल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान, ब्रिटनहून आलेल्या चार जणांचे नमुने तपासणीसाठी शुक्रवारी पुण्याच्या एनआयव्हीकडे तर काही नमुने एनसीडीसीकडे पाठवण्यात आले. नव्या स्ट्रेनचा जनुकीय आरखडा तयार केला जात असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.