महाराष्ट्रात सापडलेली सोन्याची खाण झाली 58 वर्षांची…

काेयनानगर (जि. सातारा) ः राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 16 मे 1962 रोजी कोयना जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला. राज्याला प्रकाशमान करणाऱ्या या प्रकल्पाला उद्या (शनिवार) 58 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याच्या नव्हे तर देशाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा असलेला हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राला सापडलेली सोन्याची खाणच आहे. आठ वर्षे आहोरात्र केलेल्या कामातून हे महाशिल्प उभे राहिले आहे. 

नेत्यांची दूरदृष्टी… 
मालोजीराजे नाईक-निंबाळकर आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासाच्या दृष्टीतून हा प्रकल्प सुरू झाला. मुंबई-पुणे भागातील मोठे उद्योगधंदे व कारखाने तसेच दक्षिण महाराष्ट्रातील छोट्या उद्योगधंद्यांमुळे औद्योगिक क्षेत्रात राज्याचे पाऊल पुढे आहे. त्यामुळे त्या उद्योगासाठी लागणारी विजेची मागणी ही उत्तरोत्तर वाढत असल्याने अशा परस्थितीत कोयना नदीची विद्युत निर्माण शक्ती ही महाराष्ट्रास नैसर्गिक देणगीच ठरली आहे. 

कोयना परिषद निर्णायक… 
तळोशी येथील झोळाईच्या रानात 16 मार्च 1952 रोजी झालेली कोयना परिषद निर्णायक ठरली. या परिषदेला आचार्य प्र. के. अत्रे, संत गाडगे महाराज, लोकनेते बाळासाहेब देसाई, ना. ग. गोरे, श्री. श. नवरे, कर्मवीर भाऊराव पाटील, यमुताई किर्लोस्कर, रामानंद महाराज, शंकरराव ओगले, भाऊसाहेब हिरे आदींची उपस्थिती होती. 

आठ वर्षे आहोरात्र परिश्रम… 
दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या भागातील औद्योगिक आणि शेतीचा विकास करण्यासाठी कोयना प्रकल्पाचा पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात यावा, या मागणीला 16 जानेवारी 1954 रोजी हिरवा कंदील मिळाला. कोयना प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर त्याचे फायदे अनेक स्वरूपात भेटले आहेत. 1954 मध्ये या प्रकल्पाच्या कामास सुरवात झाली. आठ वर्षे अहोरात्र परिश्रम करून राज्याच्या विकासाचे हे महाशिल्प साकारले आहे. 

तिमिरातून तेजाकडे… 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 16 मे 1962 रोजी हा प्रकल्प कार्यान्वित झाला. त्यावेळी सर्व आसमंत कवी यशवंताच्या “आनंदभुवनी या ज्ञातेकर्ते या, या दरीत सह्याद्रीच्या, केवढी पाहा ही किमया’ या गीताने दुमदुमून गेला होता. कोयना प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले. तेंव्हापासून महाराष्ट्रातील जनता तिमिरातून तेजाकडे गेली आहे. कोयनेची वीज महाराष्ट्राच्या छोट्या-मोठ्या भागात खेळत आहे. त्याचा दृष्य स्वरूपात लाभ पाहावयास मिळत आहे. कोयनेच्या विजेमुळे औद्योगिक वाढ राज्यात झपाट्याने झाली आहे. त्यामुळे कोयना ही महाराष्ट्रास सापडलेली सोन्याची खाण म्हणून ओळखली जात आहे. 

 

त्या केवळ लढल्याच नाही तर जिंकल्याही

 

Leave a Reply

Your email address will not be published.