मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई न्यायालयानं दिलेल्या अंतरिम जामीनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

अर्णब गोस्वामींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेताच राज्य सरकारनं खबरदारीचं पाऊल उचललंय. राज्य सरकारतर्फे अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आलंय. राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोर्टानं निर्णय देऊ नये यासाठी हा कायदेशीर उपाय आहे. अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली आहे. सत्र न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तातडीची सुनावणी करण्यास नकार दिल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं सलग तीन दिवस त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. त्यांना पुन्हा सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. अखेर आज उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अर्णब गोस्वामी तळोजात का?

अलिबाग कारागृहाच्या कैद्यांसाठीच्या विलगीकरणातून अर्णब गोस्वामी यांना रविवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आलं. गोस्वामी यांना ज्या नगर परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलं होतं तिथं कोठडीत ते मोबाईल वापरताना आढळून आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजात हलवण्याचा निर्णय जेल प्रशासनानं घेतला.

प्रकरण काय आहे ?

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरीम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर विस्तृत सुनावणी घेत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.